शेतकऱ्यांचे विषय मांडणाऱ्या या महाराष्ट्रातल्या टिकटॉकरची, यूट्युबनेही ओळखली किंमत

0

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण फक्त एकाच चेहऱ्याला समोर आणतो, राजकारण्यांच्या. देशातील राजकारणी शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न संपवतील, असं आपण आपल्या मनातल्या मनातच ठरवतो आणि जेव्हा हा मायबाप शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा त्याची दुषण सरकारला देत बसतो.

मात्र आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत, जे सरकारच्या या कुबड्या सोडून देऊन, स्वतःच्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर शोधून काढून प्रगतीच्या दिशेने मार्ग काढत आहेत.

असाच एक शेतकरी मित्र आहे महाराष्ट्रातला, जो शेतीसोबतच टिकटॉकवर शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन व्हीडीओ बनवायचा. लवकरच तो टिकटॉक वर प्रसिद्ध देखील झाला; पण भारत सरकारने टिकटॉकवर बंदी आणली आणि या पठ्ठ्याच्या या नाविन्यपूर्ण कल्पनांना खीळ बसली

पण हार मानेल तो शेतकरी कसला, या उक्तीप्रमाणे त्याने यावर देखील उपाय शोधून काढला आणि आज गूगलच्या युट्युबने देखील त्याची दखल घेतली आहे.

या शेतकरी मित्राचे नाव आहे, गणेश फरताडे. गणेश हा शेतकरी कुटुंबात वाढलेला, त्यामुळे अगदी लहानपणापासून शेती त्याच्या नसानसांत भिनली आहे. गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव गावामध्ये त्यांची शेती आहे. परंतु, या जोडीला त्याने समाज माध्यमांचा देखील उपयोग केला आणि याद्वारे त्याच्या डोक्यात शेतकऱ्यांचे विषय मांडण्याची कल्पना आली.

समजा माध्यमांचा चांगला उपयोग कसा केला जाऊ शकतो हे आज गणेशने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांविषयी बोललं पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत या जाणीवेतून त्याने या माध्यमाचा उपयोग करण्याचे ठरवले. लवकरच त्याने टिकटॉक या माध्यमाचा उपयोग करून, त्यावर याविषयी व्हिडीओ मधून संवाद साधण्याचे काम सुरु केले. मात्र या माध्यमावर भारताने २०२० मध्ये बंदी घातली.

यानंतर तो गूगलच्या युट्युब माध्यमाकडे वळला. यातून त्याने आपले समाजपयोगी कार्य सुरूच ठेवले. इथे त्याच्या कल्पनांना वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मांडता मांडता, तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करू लागला. बघता बघता इथेही त्याला प्रसिद्धी मिळू लागली आणि आजच्या घडीला त्याचे युट्युब वर १ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत.

तो हे व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी बनवत नाही तर यासाठी तो अनेक तज्ञांचं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेतो. त्यामुळे त्याला अनेक विषयांचं सखोल ज्ञान मिळालं.

तो म्हणतो, ” एखाद्या माध्यमावर आपण व्हिडीओ बनवतो, तेव्हा त्याचा आपण समाजासाठी चांगला उपयोग कसा करू शकतो. त्यांच्यात आत्मसन्मानाची धमक कशी तयार करू शकतो, या दृष्टीने काम केले पाहिजे.”  त्यामुळे येत्या काळात असे अनेक गणेश समाज या गणेश कडून प्रेरणा घेऊन समाज माध्यमांद्वारे चांगला समाज घडवण्याचे कार्य करू लागले, तर त्यात नवल वाटायला  नको.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.