
राज्यकर्त्यांनी राज्य कसे चालवावे याचे सल्ले देखील आता तुम्ही देऊ लागला आहात – विलासराव देशमुख!
ज्येष्ठ संपादक/लेखक/ब्लॉगर श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी सांगितलेला हा किस्सा. विलासरावजींची आणि माझी ओळख साधारण १९७२ पासूनची होती. त्यांचा राजकारणातला आणि माझा पत्रकारितेतला प्रवास समांतर राहिला.
आमची मैत्री आणि स्नेह शेवटपर्यंत निर्मळ असा खळाळत राहिला. तो काळ खूप वेगळा होता. तेंव्हाचे राजकारण वेगळे होते. विलासराव जींचा हजरजबाबीपणा व शिष्टाचार पाळण्याची विलक्षण अशी शैली होती. आपल्या पदाचा कुठलाही रुबाब न दाखवता, लोकांना आपलंस करून घेण्याची त्यांच्याकडे कला होती.
त्या वेळी “लाखोळी डाळीचा मुद्दा पूर्व विदर्भात खूप कळीचा बनला होता.शासनाने या डाळीवर बंदी आणली होती.ही डाळ गरिबांचे खाद्य असल्याने त्यावरील बंदी उठवावी यासाठी नागपूरचे शांतीलाल कोठारी आग्रही होते. प्रत्येक अधिवेशन काळात ते आंदोलन करायचे परंतु प्रश्न काही निकाली निघत नव्हता विलासरा असताना कोठारी यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आणि उपोषण सुरू केले.
प्रशासनाने त्या उपोषणाची फारशी दखल घेतली नाही. दिवस जसे जात होते तसे शांतीलाल कोठारी यांची प्रकृती खालावत जाऊ लागली होती. यावर तोडगा नाही निघाला तर त्यांच्या प्रकृतीचे काही तरी बरं वाईट होईल याची चिंता मला वाटू लागली. मी तत्काळ विलासराव देशमुख यांना फोन लावला, मीटिंगमध्ये असल्याने त्यांनी तो उचलला नाही.
मात्र काही वेळाने त्यांचा मला फोन आला.
कोठारी यांच्या उपोषणा विषयी सविस्तरपणे मी त्यांच्याशी बोललो. यावर सरकारची नेमकी काय अडचण आहे, हे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे डाळीच्या प्रश्नावर तोडगा काढणे कठीण आहे. अशा वेळी काय करावे असे म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणालो, कोठारी यांच्या प्रकृतीचा विचार करता तात्पुरती स्थगिती उठवा व पुढील प्रक्रियेसाठी एक समिती नेमा.
राज्यकर्त्यांनी राज्य कसे चालवावे याचे सल्ले देखील आता तुम्ही देऊ लागला आहात असं हसत- हसत विलासरावजी मला म्हणाले. आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभेत लाखोळी डाळी वरील बंदी तात्पुरती स्वरूपात हटवण्याची घोषणा त्यांनी केली.
राज्यातील कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. कोणताही प्रश्न सुटला पाहिजे.
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.