
आयडियाची कल्पना! मुलांचा अभ्यास व्हावा म्हणून अख्खं गाव बनलं शाळा
सध्या सगळीकडेच लॉकडाऊन असल्यामुळे सध्या शाळा बंद आहेत. यामुळे लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिथे नेटवर्क आहे तिथे किमान थोडाफार अभ्यास होतो; जिथे नेटवर्क नाही त्या ठिकाणी मुलांचा अभ्यास होताना दिसत नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा, शिकवणी, क्लासेस असे सगळे बंद आहे. मुलांचे होणारे नुकसान हे फार मोठे आहे.
ग्रामीण भागात नेटवर्क नाही आणि शाळाही बंद तिथे नेमकं काय करायचं हा प्रश्न उभा असतो. याच प्रश्नावर उत्तर शोधलं आहे ते भोर तालुक्यातल्या म्हाळवाडी गावातल्या तरुणांनी. या तरुणांनी एक भन्नाट कल्पना शोधली. त्यांनी अख्ख्या गावाचीच शाळा बनवली आहे.
मुलांचा होणारे नुकसान समोर दिसत असताना नेमके काय करावे हे सुचत नव्हतं. मुलांची शिकवण पण घेता येत नव्हती. यावर नेमका मार्ग काय ? तरुणांच्या डोक्यात एक कल्पना आली की गावातील भिंतीवरच धडे गिरवले तर ? ही संकल्पना सगळ्यांनाच आवडली. गावातील पेंटर स्वतः हुन समोर आले. गावातील सगळ्या भिंतीवरती मुलांच्या अभ्यासाचे धडे गिरवले. सगळं गाव शाळा होऊन गेलं. असे सगळ्या साठी पुढाकार घेणारे राजेश बोडखे सांगत होते. यासाठी येणारा तब्बल दीड लाखांचा खर्च बोडके यांनी उचलला. विज्ञान गणित इतिहास भुगोलापासून ते अगदी फोनेटिक्स पर्यंत अनेक धडे भिंतींवर रंगले आहेत. गावातल्या जवळपास 85 घरांच्या भिंती आता या रंगात रंगल्या आहेत.
या शाळेत शिक्षक असणारे गणेश बोरसे म्हणाले “इथे गावात नेटवर्क ची अडचण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला अडचण येत होती.आम्ही मुलांकडे जायचो पण त्यात दिवसाला पाच ते सहा मुलं कव्हर व्हायची. त्यामुळे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हा पाढे, काही धडे, असा सगळं रंगवून घेतलं. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून ही संकल्पना सर्वोत्तम आहे. ही संकल्पना गावोगाव राबवण्याचा प्रयत्न आजूबाजूचे गाव करत आहेत.