
लवकरच राज्यात लागू होणार आणखीन कडक निर्बंध
मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
तसेच राज्यातील पोलीस प्रशासनाला, कडक निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
मात्र, तरीही आज राज्यात अनेक ठिकाणी, जमावबंदीला झुगारून नागरिकांनी किराणा माल, भाजीपाला मार्केट, सार्वजनिक ठिकाणी व इतर अनेक ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिले आहेत.
राज्यात कडक निर्बंध लावूनही गर्दी कमी होत नसल्याने सरकार हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पेट्रोल पंप, किराणा दुकान, लोकल, भाजीपाला यांवर येणार निर्बंध येणार असून, लोकांचा जीव वाचवण्यासाठी अजून कडक निर्बंध लावावेत लागतील असे त्यांनी म्हटले आहे. TV 9 या वृत्तवाहिनीशी बोलत असताना मंत्री वडेट्टीवारांनी ही माहिती दिली आहे.