
का पितात माठातले पाणी? एकदा नक्की वाचा
उन्हाळा सुरू झाला की, सगळीकडे हवामान उष्ण होऊ लागते. उकडू लागते. तसेच घाम येऊ लागतो. मुख्यत्वेकरून घसा कोरडा पडतो किंवा सोस पडतो म्हणजेच सातत्यान तहान लागते. या दिवसात इतर ऋतुंपेक्षा शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते. उन्हाळ्यात सरबत, थंड पेय वारंवार प्यावीशी वाटतात.
सध्या सर्वच ठिकाणी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. फ्रिजमध्ये हवे तेवढे थंड पाणी तसेच बर्फ तयार करून मिळतो. परंतु उन्हातून आल्यावर एकदम लगेचच एसी, कूलरची हवा घेणे, फ्रिजमधील थंड पाणी पिणे शरीराला हानिकारक ठरते. यांमुळे शरीराचे तापमान एकदमच उतरून उन्हाळे लागणे, सर्दी होणे, छाती भरणे असे विकार होतात.
भारतीय परंपरेत मातीची भांडी वापरणे आरोग्यदायी तसेच चविष्ट व रुचिपूर्ण स्वयंपाकासाठी महत्वाचे मानले जाते. लाल मातीची भांडी अन्नपदार्थ शिजवायला उत्तम समजली जातात. सध्याच्या आधुनिक काळातही मातीच्या भांड्यात मंद आंचेवर शिजवलेला एखादा पदार्थ चविष्ट लागतो म्हणून बनवला जातो. मातीच्या भांड्यात लावलेले दही कवडी पडणारे तसेच मातीचा मंद सुगंध लागलेले असते. पूर्वी फ्रिज नव्हते तर त्याकाळी मातीचा मोठा डेरा, माठ पिण्याच्या पाण्यासाठी भरून ठेवला जात असे. हा माठ किंवा डेरा दिवसभर रुचिपूर्ण व आरोग्यदायी पाणी पुरवत असे. आधुनिक काळात फ्रिजच्या वापरामुळे माठाच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. परंतु माठातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे समजल्याने अनेकजण फ्रिज असूनदेखील पाणी पिण्यासाठी पुन्हा माठाचा वापर करू लागले आहेत. मित्रांनो चला बघूया माठातील पाणी पिण्याचे फायदे.
१) मातीमध्ये अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची क्षमता असते. विशेषत: उन्हाळे लागण्याचा त्रास माठातील पाण्यामुळे दूर होतो. माठातील पाण्यात वाळा टाकून ठेवल्यास पाण्याचा आंतरिक गुणधर्म बदलण्याबरोबरच पाणी सुगंधित होते.
२) माठातील पाणी त्याच्या सच्छीद्रतेतून बाहेर झिरपते. या झिरपलेल्या थेबांचे बाष्पिभवन व्हावे यासाठी माठातील पाण्यातील उर्जा घेतली जाते. त्यामुळे माठातील पाणी थंड होत जाते. पाणी थंड होणे बाष्पिभवनावर अवलंबून असल्याने जेवढे बाष्पिभवन अधिक तेवढे पाणी थंड होते. असे पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. असे पाणी पिल्यास शरीराला दिर्घकाळ थंडावा मिळतो. पाणी पिण्याचे समाधान किंवा तृप्ती मिळते. मन शांत होते. तसेच प्रतिकारशक्ती वाढून तुम्ही निरोगी आयुष्य जगता.
३) माठातील पाणी पिल्याने आपली पचनशक्ती मजबूत होते. पचनप्रणाली सुधारल्याने शरीर निरोगी राहते. वजन संतुलित राहते. तसेच जर तुम्ही माठातील पाणी नियमित पिलात तर शरीरात नको असलेले घटक सहजरित्या बाहेर उत्सर्जित होतात.
४) माठातील पाणी पिण्याचा सर्वांत मोठा फायदा पोटाला होतो. पोटाशी निगडित अनेक आजार जसे बध्दकोष्ठता, पित्त, मुरड इ. अनेक आजार दूर होतात. फ्रिजमधील अतिथंड पाणी पिल्यास घशाचे आजार होऊ शकतात. घसा दुखू शकतो म्हणूनच परंपरागत माठातील स्वस्थ पाणी प्या आणि मस्त राहा.
मित्रांनो हा उपाय आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा व लेख तुमच्या स्नेहीजनात जरूर शेअर करा.