
मोदी सरकारला घाम फोडणाऱ्या लोकसभेतील भाषणामुळे चर्चेत आलेल्या खासदार माहुआ मोईत्रा कोण आहेत?
तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषण सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील गेल्या दोन दिवसांपासून त्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आपल्या भाषणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांच्यावर हल्ला चढविला आहे. या भाषणानंतर सत्ताधारी पक्षाचे संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांच्या भाषणावर अनेकांचा आक्षेप असून त्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार सुरू आहे. मात्र, मोइत्रांनी कायदेशीरदृष्ट्या सक्षम असल्याने सरकारने असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भाषणानंतर त्यांचे खूप कौतुकही होत आहे. असे म्हटले जात आहे की संसदेत भीती न बाळगता बोलणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत.
महुआ मोईत्रा एक धारदार राजकारणी आहेत. हुशार आहेत, आकर्षक आहेत आणि भारतीय राजकारणात त्या सतत लोकप्रिय होत आहेत. त्यांची अशी अनेक भाषणे झाली ज्यामुळे त्यांच्यावर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णानगर येथे त्यांनी भाजप उमेदवाराचा १६००० हून अधिक मतांनी पराभव केला. तथापि, त्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी नाही.
त्या बर्याचदा वादात राहिल्या आहेत. कधी बंगालच्या स्थानिक माध्यमांनी त्यांच्या वक्तव्यावर राग व्यक्त केला आहे, तर कधी भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांच्याशी त्यांचे मौखिक द्वंद्व झाले आहे. आसाममधील एका महिला पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ०५ फुट ०६ इंच उंच असलेल्या मोइत्रा यांनी भारताच्या संसदीय राजकारणात पाऊल टाकून तब्बल पाच वर्षे झाली आहेत. त्यांनी प्रथम तृणमूलच्या तिकिटावर करीमनगर येथून विधानसभा निवडणूक लढविली आणि जिंकली आणि त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले.
त्या ४५ वर्षांच्या आहेत. कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला आहे. तिथल्या महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. त्यानंतर त्यांनी जेपी मॉर्गन येथे नोकरी सुरू केली. कंपनीमध्ये त्यांची विलक्षण कामगिरी बघून त्यांची लंडनमधील जे पी मॉर्गन कंपनीच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आले होते. एका दृष्टीकोनातून त्यांचे आयुष्य चांगले होते आणि त्यांची कारकीर्द तल्लख होती. पैशाची कमतरता नव्हती. पण त्यांना असे वाटले की अशा नोकरीत त्यांना बांधले जाऊ शकत नाही. त्यांना पूर्णपणे काहीतरी वेगळे करावे लागेल. कोलकात्यातील महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यापासून त्यांना राजकारणात रस होता.
सन २००८ मध्ये त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि त्या भारतात परतल्या. भारतात आल्यावर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांना बंगालमधील युथ कॉंग्रेसमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. लवकरच त्या बंगाल युथ कॉंग्रेसमधील प्रमुख नेत्यांमध्ये सामील झाल्या. राहुल गांधी त्यांना ओळखत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. त्यांनी बंगालमध्ये कॉंग्रेसचे कार्यक्रम चांगलेच पार पाडले. परंतु तेथील निवडणूकीत जेव्हा कॉंग्रेसने डाव्या पक्षांशी युती केली तेव्हा त्या संतापल्या आणि त्यानंतर त्या तृणमूल कॉंग्रेसकडे वळल्या होत्या.
तृणमूलमध्ये आल्यानंतर त्यांचे नाणे येथेही चालू लागले. त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्या ममता दीदींच्या जवळ आल्या. त्यांनी ममतांचा विश्वास संपादन केला. लवकरच पक्षाने त्यांना प्रवक्ता देखील केले. सन २०१६ मध्ये राज्यात निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांना तिकीट मिळाले. यानंतर ममता दीदींनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास टाकत त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. आता लोकसभेत सर्वात वेगवान आणि सामर्थ्यवान खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
महुआने अमेरिकेत शिक्षण पूर्ण करत असताना किंवा लंडनमध्ये मुक्काम केल्यानंतरच्या काळात डेन्मार्कच्या लार्स बोरसन यांच्याशी लग्न केले होते पण त्यांचा आता घटस्फोट झाला आहे. त्यांना सुंदर चित्रांची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात बरीच चांगली चित्रे आहेत. त्या सहसा साडीमध्ये दिसतात. तथापि, जेव्हा त्या कॉर्पोरेट जगात नोकरी करीत होत्या, तेव्हा त्या स्मार्ट कॉर्पोरेट ड्रेसमध्ये दिसत होत्या. परंतु आज त्यांचा वैशिष्ट्य आणि क्षमतेच्या बळावर त्या लोकसभेतील विरोधकांचा आवाज बनल्या आहेत.