
महाराष्ट्रातील दोन राजकीय घराणी सांगा असा प्रश्न जर तुम्हाला कुणी केला तर आपसूकच तुमच्या तोंडून नावं येतील ठाकरे आणि पवार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन्ही आडनावाच्या नेत्यांनी जवळजवळ ५० वर्षे राज्य केले आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे दोघेही विचारधारांप्रमाणे एकमेकांचे कट्टर विरोधक आणि जेवढे कट्टर त्याही पेक्षा कितीतरी जवळचे मित्र.
दोघांनी आपली राजकीय कारकीर्द जवजवळ सारख्याच साली सुरु केली. दोघांनीही एकमेकांवर टीका केली. आरोप केले, प्रत्यारोप केले, अबोला धरला परंतु याने कधीही त्यांच्या मैत्रीत दुरावा आला नाही न त्यांची माने दुखावली गेली. बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे होते आणि असे असले तरी दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवली आणि असे किस्से पवारांनी देखील सांगितले आहेत.
अनेकदा बाळासाहेब खासगीत आणि जाहीर सभांमध्ये शरद पवारांना ‘शरदबाबू’ अशी हाक मारत. मात्र, राजकीय विरोधाच्यावेळी त्यांनी शरद पवारांवर ते ‘मैद्याचं पोतं’ असल्याची टीकाही केलेली अनेकांनी पाहिली, वाचली आणि ऐकली आहे. पवारांनीही बाळासाहेबांवर टीका केली असली, तरी दोघांनीही कधी एकमेकांविरुद्ध जहाल शब्द वापरले नाहीत.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे या दोघांमध्ये एकमेकांच्या पक्षाविरोधात प्रचार करण्याचे अनेक प्रसंग आले. परंतु, राजकारणापलीकडे जाऊन दोघांनी आपली मैत्री टिकवली.