जेव्हा गडकरींनी धीरूभाई अंबानींना दिलं होतं ‘हे’ चॅलेंज

0

देशात असे अनेक नेते होऊन गेले किंवा आजही आहेत, ज्यांची जागा थेट लोकांच्या मनात आहे. भारतचे सध्याचे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे त्यांपैकीच एक. रस्ते बनवण्यासाठी हे अगदी १९९५ च्या काळापासून प्रसिद्ध आहेत.

नितीन गडकरी यांना भारताचे ‘रोडमॅन’ म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांच्या कार्यकाळात देशात रेकॉर्डब्रेक अशा वेळात रस्त्यांची निर्मिती होत आहे. तशीच त्यांची खासियत म्हणजे ते रस्ता बनवण्यासाठी पैशांची कशी बचत होईल आणि तो कसा कमीत कमी पैशांमध्ये मध्ये बनेल यासाठी प्रयत्न करतात. देशात मागील आर्थिक वर्षात २६.११ किलोमीटरच्या गतीने, रस्ते आणि महामार्ग विकास मंत्रालयाकडून जवळपास तब्बल ७५७३ कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांच्याच काळात मुंबई-पुणे हा प्रसिद्ध महामार्ग बनवण्यात आला होता. तर सांगायची गोष्ट म्हणजे याच, रस्ते तयार करण्याच्या कारणासाठी एकदा या ‘रोडमॅन’ने, धीरूभाई अंबानी यांच्यासोबत पंगा घेतला होता. त्यांनी धीरूभाईंना अंबानींना चक्क, ‘मिशी काढून देईल’ असे चॅलेंज दिले होते.

त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. धीरूभाई अंबानी हे त्याकाळी देखील एक बड प्रस्थ होतं. तेव्हा एका रोडच्या कामाचं टेंडर निघालं होतं. त्यात धीरूभाईंनी ३६०० कोटींचं सर्वात कमी टेंडर भरलं होतं; पण नितीन गडकरींना विश्वास होता, की तो रस्ता फक्त २००० कोटीतच पूर्ण होईल. पण सर्वात कमी टेंडर तर ३६०० कोटींचं होतं. त्यामुळे कमी टेंडर ज्याचं त्यालाच ते काम मिळायला हवं. याप्रमाणे ते काम धीरूभाई यांना मिळणार यात वादच नव्हता.

मात्र गडकरींनी ही गोष्ट उपमुख्यमंत्री मुंडेंच्या कानावर घातली आणि त्यांना टेंडर रिजेक्ट करावे असे सुचवले; पण त्यावेळी धीरूभाईंचा मोठा दबदबा होता. तरीही गडकरी मागे हटले नाहीत. त्यांनी जोशींना आणि मुंडेंना समजावलं आणि याहीपेक्षा स्वस्तात मी रस्ता करतो, असे ते म्हणाले.

सरकारची तिजोरीत त्यावेळी खडखडाटच होता. त्यावेळी एवढे पैसे कुठून आणणार, त्यामुळे असा प्रश्न जोशींनी गडकरी यांना केल्यावर गडकरी म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि या विश्वासावरच मुख्यमंत्री जोशींनी ते टेंडर नाकारलं. धीरूभाई टेंडर नाकारल्याने नाराज झाले. धीरूभाईंचे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांसोबतचे राजकीय लागेबांध चांगले आणि सलोख्याचे होते. त्यामुळे त्यांनी यांच्याकडे नाराजीही व्यक्त केली.

फोन फिरले आणि नितीन गडकरी एकेदिवशी धीरूभाईंना भेटायला गेले. अनिल, मुकेश, धीरूभाई आणि गडकरी यांनी सोबत जेवण केलं. आणि हीच वेळ गाठून त्यांनी जेवता-जेवता गडकरी यांना प्रश्न विचारला, कसा बनवणार रोड? आणि धीरूभाईंनी नितीन गडकरींना चॅलेंज केलं. आणि थेट तोंडावर म्हणाले, हा रस्ता होऊच शकणार नाही.

जेवणाच्या ताटावर बोललेले हे शब्द गडकरींच्या काळजात जाऊन टोचले. आणि त्यांनी देखील गडकरी गर्जना केली की, “हा रोड मी बनवला नाही तर माझ्या मिशा मी कापून टाकेन.” सोबतच त्यांनी रस्ता बनवला, तर तुम्ही काय करणार, असंही विचारलं.

पैसे कुठून येणार हा मोठा जटील प्रश्न होता. नितीन गडकरींनी अनेक कंपन्यांना त्यासाठी प्रस्ताव पाठवले. नितीन गडकरींनी त्यावेळी राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. आणि अखेर त्या रस्त्यासाठी पैसे मिळाले. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने आणि मुंगीरवार या अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरु झाले. आणि आश्चर्य म्हणजे हे काम गडकरींनी २००० कोटींपेक्षाही कमी किमतीत करून दाखवलं.

रोड २००० कोटींपेक्षाही कमी किमतीत झाल्याचं कळताच, तिकडे धीरूभाई यांनी गडकरींना लगेचच भेटायला बोलावलं. आणि भेटल्यावर धीरुभाई त्यांना म्हणाले, ‘नितीन मै हार गया तुम जीत गये| तुमने कर दिखाया और रोड तैयार हो गया|” आणि पुढे ते गडकरींना म्हणाले, “तुझ्यासारखे ४-५ लोक जरी देशात असतील न तर देशाचं नशीबच नक्कीच उजळेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.