
एकदा शेन वॉर्न सचिन तेंडुलकरच्या घरी जेवणासाठी गेला होता. त्यावेळचा एक किस्सा बराच गाजला होता. स्वत: वॉर्न आणि सचिनने या गोष्टीचा खुलासा केला होता. सचिनच्या घरी डिनर करत असताना वॉर्नने चिकनवर ताव मारला आणि त्याला चक्कर आल्यासारखं झालं होतं, त्यानंतर नेमकं घडलं तरी काय याचा खुलासा सचिनने यावेळी केला आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नला क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर म्हटले जाते. या महान गोलंदाजाचे ४ मार्च रोजी आकस्मिक निधन झाले. यामुळे क्रिकेट विश्वातील अनेकांना धक्का बसला. वयाच्या ५२ व्या वर्षी या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वॉर्न हा क्रिकेट वर्तुळात अनेकांचा जवळचा मित्र होता. त्यालाही भरभरून प्रेम मिळाले. त्याच्या अचानक जाण्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.वॉर्न हा मैदानावर एक अद्भुत क्रिकेटपटू तर होताच, पण मैदानाबाहेरही तो खूप मजेदार आणि दर्यादिल व्यक्ती म्हणून ओळखला जात असे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी त्याची मैत्रीही खूप गाजली. खेळपट्टीवर या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा असताना मैदानाबाहेर त्यांच्यात खूप चांगले संबंध होते. ऑस्ट्रेलियाच्या १९९८ च्या भारत दौऱ्यावेळी वॉर्नने मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी भेट दिली होती. सचिनने त्याला जेवणासाठी बोलावले होते. जेवणावेळी वॉर्नला मसालेदार चिकन डिश देण्यात आली. वॉर्नला सुरुवातीला वाटलं की, तो इतका मसाला आरामात खाईल, पण तसं झालं नाही.अॅमेझॉन प्राइमच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये या घटनेची आठवण वॉर्नने सांगितली आहे. “सचिन आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र होतो आणि अजूनही आहोत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही वॉर्न विरुद्ध तेंडुलकर अशी ओळखली जायची. मी सचिनच्या घरी गेलो होतो… रात्रीचे जेवण करून लगेच हॉटेलवर परत येईन असे वाटले होते.’तो पुढे म्हणाला, ‘मी चिकनचा एक छोटा तुकडा खाल्ला आणि मला चक्कर आल्यासारखे वाटले. तरीही मी तो तुकडा चघळत राहिलो.
सचिन आणि त्याच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.’या पुढची गोष्ट सांगताना सचिन म्हणाला की, ‘माझ्या लक्षात आले आहे की, वॉर्न माझ्या मॅनेजरशी सतत बोलत होता. माझ्या मॅनेजरने सांगितले की, वॉर्नने काहीही खाल्ले नाही. मी इतर पाहुण्यांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे ते पाहू शकलो नाही. तेव्हा मला कळले की, वॉर्न मसालेदार पदार्थ खाऊ शकत नाही. त्याला मला दु:खी करायचे नव्हते, पण त्याने माझ्या मॅनेजरकडे मला मदत करा, अशी विनंती केली. संध्याकाळी तो आमच्या स्वयंपाकघरात गेला आणि काही सॉसेज, बीन्स आणि उकडलेल्या बटाट्यांपासून काहीतरी बनवले. त्यानंतर तो माझ्या ताटातही जेवला. शेन वॉर्न असाच होता.’