रायबा तान्हाजी मालुसरे यांचे पुढे काय झाले?

0

” आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे ” असे नरवीर तानाजी मालुसरे म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचा विवाह आणि कोंढाण्याचे युध्द एकत्र आले, परंतु तान्हाजींनी कोंढाण्याचे युध्द जिंकून कोंढाणा गड ताब्यात आणून दिला. पुढे तान्हाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचे काय झाले हेच आपण जाणून घेणार आहोत. तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.

तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर स्वता शिवाजी महाराजांनी उमरड येथे जाऊन रायबाचे लग्न लावून दिले. इ. स १६७४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळ एका डोंगरावर एक किल्ला बांधला. चारही बाजूला अतिशय घनदाट जंगल असलेल्या पारगडावर १६७६ साली छत्रपती शिवाजी महाराज स्वता उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच पारगडचा गृहप्रवेश आणि वास्तुशांती पार पडली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना पारगडचा किल्लेदार नेमले. रायबा मालुसरे यांच्यासोबत शेलार मामा होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोघलांची पारगडावर अनेक आक्रमण झाली.

मावळ्यांनी गड सुरक्षित ठेवला. रायबा मालुसरेंना पारगडाचे किल्लेदार नेमले तेव्हा एक राजाज्ञा दिली होती. ती म्हणजे, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत गड जागता ठेवा. छत्रपतींच्या मृत्यूनंतरही तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी पारगड जागता ठेवला आहे. तान्हाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोडींबा शेलार, गडावरील खींडी लावण्याचे काम असलेले बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, घोडदळ प्रमुखांचे वंशज विनायक नांगरे, गडकर्यांचे वंशज शांताराम शिंदे, त्याच्याबरोबर तोफखाना प्रमुख विठोजी मिळवू यांचे वंशज आजही पारगडावर वास्तव्यास आहेत. तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे एका युद्धात धारातीर्थी पडले त्यांची समाधी आजही पारगडावर बघायला मिळते. पारगड अजिंक्य होता आणि अजिंक्यच राहिला.

तर ही होती आपले इतिहास गाजवणारे तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे पुत्र रायबा यांची माहिती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.