असं काय झालं की पवार साहेबांना हसू आवरलं नाही…

0

जगात असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ज्याचा संबंध पुलं आणि गदिमा या नावांशी आला नसेल. ही दोनही अशी नावं आहेत जी मराठी माणसाच्या मनामनात आणि नसानसांत आहेत. शरद पवारांच्या आयुष्यातही या दोन व्यक्तींचा संदर्भ येतो.

२००३ साली शरद पवारांनी बारामतीमध्ये गदिमांच्या नावाने मोठे सुसज्ज सभागृह बांधले, त्याच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी, माडगूळकर कुटुंबियांना मोठ्या आग्रहाने बोलावले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखून माडगूळकर कुटुंबीय उद्घाटनाला उपस्थित राहिले. त्यावेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा…

बारामतीतील साहित्यमंडळातर्फे एक कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग.दि.माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे यांना बोलावण्याचे ठरले. या दोन थोर व्यक्तींनी ते मान्यही केले. आता दोघेही मोठे साहित्यिक कार्यक्रमाला बारामतीत येणार म्हणून बारामतीकर खुश होते.

दरम्यान, बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून या साहित्यपंडितांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली. आता त्यांना एस.टी तून बसवून तर आणता येणार नाही. मग त्यासाठी गाडी केली पाहिजे असं पवारांच्या डोक्यात आलं पण, इथेच त्यांची मोठी पंचाईत झाली.

त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती! पण शरद पवार ते शरद पवार! त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला गाठले. त्याची गाडी मिळवली आणि ठरल्याप्रमाणे दोघे आले. कार्यक्रमदेखील अतिशय सुंदर झाला. आता दोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले. ज्या बागायतदाराची ती गाडी होती, त्याला सुद्धा अचानक शहरात काम निघाल्यामुळे, तोही बरोबर निघाला.

आता हा बागायतदार अगदी टिपीकल व्यापारी असतात ना तसा होता. जाडजूड, काळाकुट्ट (अगदी अंधाराच्या सावली सारखा) हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या, गळ्यात चेन वगैरे वगैरे…

साहेबांनी दोघांची ओळख करुन दिली, “हे ग.दि.माडगूळकर, हे पु.ल.देशपांडे (मोठे लेखक आहेत हं!), “बरं बरं नमस्कार नमस्कार!” बागायतदारांनी ओळख करुन घेतली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. त्या ऐन रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी बॉम्बचं टाकला. “माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?” आता आली का पंचाईत!

गदिमा अती कोपिष्ट, तर पुलं हजरजबाबी. आता दोघेही काय प्रतिक्रिया देतात, याची पवारांना चिंता वाटू लागली. तेवढ्यात पुलंनी शांतपणे उत्तर दिले, “हे माडगूळकर आहेत ना…ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो!”.

आणि पवारांना हसू आवरले नाही…गाडीत एकच हशा पिकला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.