विलासराव देशमुखांचा हा किस्सा त्यांच्या मिश्किल स्वभावाची साक्ष देतो!

0

विलासराव देशमुखांचा दिलखुलास स्वभाव ही त्यांची रुबाबदार व्यक्तिमत्त्वा बरोबरच ओळख होती. कार्यकर्ते असोत, विरोधक किंवा सत्ताधारी असोत. सगळ्यांशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध होते. त्यांची टीका करण्याची शैली सुद्धा तितकीच दिलखुलास होती. गोड बोलून हळूच चिमटे काढण्यात, कोणाचेही मन न दुखावता टिका-विनोद करण्यात विलासराव देशमुख पारंगत होते.

एकदा असाच एक विनोदी किस्सा विलासरावांमुळे सभागृहात घडला होता. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते तर नानाभाऊ एबंडवर वनमंत्री म्हणून जबाबदारी पाहत होते. सभागृहात पर्यावरणाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या चर्चेत नगरचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ठुबे म्हणाले..

“राज्यात प्रचंड जंगल तोड झाली आहे. कुठेही जंगल दिसत नाही. परंतु वनमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की जंगलाची वाढ तिथेच झालेली दिसते”. आमदार ठूबेंच्या या खोपारखळीला प्रतिउत्तर देताना विलासराव म्हणाले

“माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की सन्माननीय सदस्य श्री ठुबे यांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षरोपणाची सुरवात तिथूनच केली तर जंगलाची वाढ होण्यास वेळ लागणार नाही.”

या प्रसंगाच्या नंतर सभागृहात प्रचंड हशा पिकला होता. दोन्ही सदस्यांनी एकमेकांना हातच जोडले होते. विलासराव देशमुख यांचे बोलणे हे फार मार्मिक असायचे. माणसं जपावित, विरोधाच्या ठिकाणी विरोध; इतर वेळी मैत्री हा त्यांचा स्वभाव होता.

Leave A Reply

Your email address will not be published.