
मुख्यमंत्री उद्या संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात भार येत असून, राज्यात अजूनही बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच सोबत काही कडक निर्बंध देखील राज्यभरात लागू केले आहेत.
तरीही राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली असून, यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी राज्यात १५ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
तसेच राज्यात जिल्हाबंदीची देखील शक्यता मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. या संपूर्ण लॉकडाऊनच्या निर्णयाचा सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होईल असे संकेत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला असून, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र होणार असल्याची स्पष्ट कल्पना शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे.
याबाबत उद्या मुख्यमंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या बाबतची नवीन नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल आणि मुख्यमंत्री अधिक स्पष्टीकरण देतील, असे मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.