MIDC मध्ये काम मिळवण्यासाठी आमदाराच्या चिट्ठीसाठी फिरणारा हा तरुण आज आमदार आहे!

0

राजकारणाला आपल्या देशात अतिशय महत्त्व आहे. देशात सर्वात जास्त वेळ आणि काळ चालणारा व चर्चिला जाणारा विषय म्हणजे “राजकारण” होय. या क्षेत्रात येऊन यश मिळवण्यासाठी खूप कष्ट व मेहनत करावी लागते, तसेच राजकीय वारसा हा देखील तितकाच महत्वाचा ठरतो, हे आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळते.

देशातल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असून नेत्यांची मुलं, त्यांचे नातेवाईकच राजकारणात मोठ्या पदांपर्यंत पोहचतात, असं आपल्याला सर्रास पाहायला मिळतं. पण, देशात अशीही अनेक उदाहरणं आहेत, ज्या ठिकणी नेते कुठलाही राजकीय वारसा किंवा संदर्भ नसताना राजकारणात आले आणि आज ते एक लोकनेते बनले आहेत.

महाराष्ट्रात देखील असे अनेक नेते आहेत, ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना, त्यांनी राजकारणात यश मिळवून दाखवले. यात थेट ग्रामपंचायत सदस्य ते खासदारापर्यंतचा प्रवास करणारे जसे नेते आहेत, तसेच सामान्य माणसापासून ते आमदारापर्यंतचा प्रवास करणारेही नेते आहेत. अशाच प्रकारचा प्रवास करून विधानसभेवर निवडून आलेले एक नेते म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके.

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा या गावात, १० मार्च १९८० रोजी निलेश लंके यांचा जन्म झाला. निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक, तर आई शकुंतला या गृहिणी होत्या. निलेश यांना बालपणीपासूनच कुस्तीचं प्रचंड वेड होतं. त्यामुळे गावात आणि आसपासच्या परिसरात “पैलवान” म्हणून त्यांची ओळख बनली. निलेश यांना शाळेत असतानाच सामाजिक उपक्रमांची आवड होती. निलेश लंके शाळेत असतानाच गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असत.

निलेश लंके यांनी २००५ साली सर्वप्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना घरातूनच विरोध झाला. निवडणुकीत हार चाखल्यानंतर, निलेश लंके यांनी फिटर ग्रेडमध्ये नगरच्या आयटीआयमध्ये शिक्षण घेतले व कामाच्या शोधात सुपा एमआयडीसी मधील एका कंपनीत २-३ वेळा मुलाखतसुद्धा दिली, पण त्यांना काम काही मिळाले नाही. त्यावेळी त्यांना एका मित्राने सांगितले, की तिथे आमदाराच्या चिट्ठीशिवाय काम मिळत नाही. यानंतर ते अनेकांकडे चिट्ठीसाठी फिरले, पण चिट्ठी काही मिळाली नाही. निलेश लंके यांना पुढे नगरच्या कायनेटिक कंपनीत काम मिळाले, पण गावच्या राजकारणात जास्त गुंतल्यामुळे, त्यांचे हे कामसुद्धा त्यांच्या हातून गेले. त्यानंतर त्यांनी हंगा स्टॅण्डवर एक छोटं चहाचं हॉटेल सुरु केलं. परंतु, तिथेही त्यांना फारसे यश मिळाले नाही.

त्यानंतर २००७ मध्ये निलेश लंके यांनी शिवसेनेकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली, पण अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला. खिशात एक दमडी नसतानाही त्यांनी ही निवडणूक लढवली होती. परंतु, याचा त्यांना असा फायदा झाला की, या निवडणुकीमुळे गावाचा त्यांच्यावर विश्वास बसला. २०१० मध्ये ते गावचे सरपंचदेखील झाले. नंतर ते शिवसेनेचे तालुका प्रमुख बनले. पुढे २०१२ ला पत्नी पंचायत समिती सदस्य तर २०१७ ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. शिवसेनेत त्यांचं वजन वाढत असतानाच, २०१८ मध्ये उद्धव ठाकरे पारनेर येथे आले असता, त्यांच्या सभेत गोंधळ घातला हा आरोप त्यांच्यावर झाला. ज्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली.

यावेळी सर्वसामान्य जनता पाठीमागे उभी राहिल्याने निलेश लंके यांना उभारी मिळाली. त्यानंतर त्यांनी पूर्ण ताकतीने निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडूनही निलेश लंके याना विधानसभेचे तिकीट मिळाले. अखेर २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निलेश लंके ६१ हजार मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.