“अरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही”

0

पंढरपूर : राज्यात सध्या करोनासोबतच पंढरपूर पोटनिवडणुकीची देखील तितकीच चर्चा आहे. याला कारण, राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. याला आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

‘भाजपचे नेते पंढरपुरात येऊन, ‘तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो’, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला आहे.

तसेच त्यांनी भाजपवर टीका करताना, स्वतःच्या पक्षाचे आमदार फुटतील या भीतीतून भाजपकडून सातत्याने सरकार बदलाच्या वावड्या उठवल्या जात असल्याचा पलटवार केला आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राज्यात राजकारण होत आहे. अशी टीका देखील पवारांनी भाजपवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.