सचिन वाझे प्रकरणात सेनेने डागली भाजपावर तोफ!

0

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना NIA च्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या प्रकरणात NIAने हस्तक्षेप केल्याने शिवसेना नाराज असून शिवसेनेने सामनातून यावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

“मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘एनआयए’ला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती, पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील? वीस जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेऊन लगेच वाझे यांना अटक करण्याची कर्तबगारी दाखवून दिली. वाझे यांच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे त्याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडावेत. ”वाझे यांना अटक झाली हो।।” असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत,” असा घणाघात शिवसेनेन केला आहे. या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यांपूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. त्या वेळी हे सर्व लोक गोस्वामी याच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. ”थांबा, बघून घेऊ, केंद्रात आमचीच सत्ता आहे”, असे सांगत होते. तो मोका आता साधला असून २० जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात वाझे यांना केंद्रीय पथकाने अटक केली आहे, अशी टीका शिवसेनेकडून भाजपावर करण्यात आली आहे.

“महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. अंबानी हे आपल्या देशातील बडे प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या २० जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण म्हणून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते? मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपींना फासावर लटकविणारे जसे मुंबईचे पोलीस आहेत तसे ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई-महाराष्ट्राचेच पोलीस दल आहे,” याची आठवण देखील शिवसेनेने सामनातून करून दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.