
महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का, थोरातांचा सवाल
मुंबई : राज्यात करोनाने हाहाकार उडविलेला असून, राज्यात काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान यावरून राज्य सरकारमधले मंत्री आणि केंद्रातल्या मंत्र्यांमध्ये राजकीय हेवेदावे सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी, करोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे, अशी टीका केली.
याला प्रत्युत्तरादाखल काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज समाज माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, अशा शब्दात गोयल यांना सुनावलं आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का, असा सवाल देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.
दरम्यान, देशात करोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून, बाधित रुग्णांच्या संख्येत अतिशय वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात, करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले असून, राज्यात देखील १ मे पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
तसेच करोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात, करोना बाधित रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स या आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, याची उपलब्धता वाढवण्याच्या प्रयत्नात आरोग्य सुविधांवर प्रचंड भार येत आहे. परिणामी राज्यात आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.