
उद्या जर मोदींनी देशभरात लॉकडाऊन केला, तरीही महाराष्ट्रात नको म्हणून फडणवीस विरोध करतील का?
मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे जवळजवळ एकमत झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात सोमवार पासून कदाचित पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, अचानक लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी लोकांना विश्वासात घ्या, लॉकडाऊनचा रोड मॅप लोकांसमोर मांडा आणि मगच निर्णय घ्या असा आग्रह बैठकीत धरत, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर, सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना, “फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला, तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?,” असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
त्यामुळे राज्यातल्या करोनाच्या बिकट परिस्थितही, राज्यातील नेत्यांचे राजकारण थांबण्याचे नाव घेताना दिसत नसल्याचेच यातून दिसत आहे.