
करोना रुग्णांचा आकडा देशभरात नवे उच्चांक गाठत असताना, करोनावर वापर होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि संबंधित औषधांची निर्यात पूर्णपणे थांबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे.
तसेच देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना, त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
देशातील करोनाची परिस्थिती सुधारत नाही, तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि संबंधित औषधांची निर्यात बंद राहणार असल्याचं, केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं ट्विट केलं आहे.
देशात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परिणामी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची मागणी वाढत असल्याचा गैरफायदा घेऊन, देशात अनेक ठिकाणी औषधाचा काळा बाजार सुरू असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. राज्यात देखील अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.