
भाजपामध्ये दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे, शिवसेनेतही बाहेरचे, आमच्या सारखे एकनिष्ठ थोडेच : गुलाबराव पाटील
प्रत्येक पक्षांमध्ये इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नेत्यांची गर्दी झाली आहे. ही गर्दी जसे सरकार बदलेल तशी बदलत जाते. एकनिष्ठता नावाचा प्रकार राजकीय पक्षांमध्ये फारच नगण्य राहिला आहे. जिकडे सत्ता तिकडे उदोउदो अशी राज्यातील नेत्यांची परिस्थिती आहे. याच गोष्टी वरती शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की “सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. भाजपमध्ये तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीतही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत” असे शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
राजकारण म्हटले की या गोष्टी आल्याच मात्र राजकीय विचारधारा दावणीला बांधून सत्ता तिकडे उदोउदो करणार्या राजकीय पुढाऱ्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की “कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.