
भाजपा आमदारांकडून सभागृहातच धमक्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप
आज महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन चांगलेच गाजत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये भारतीय जनता पक्षाकडून धक्काबुक्की करण्यात आली व अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्यात आले त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. या अगोदर अधिवेशनाच्या चर्चेमध्ये भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जे विधान केले त्या विधानावरून चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेस पक्षाकडून सभागृहामध्ये आक्षेप घेण्यात आला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारलाय.
‘सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे”, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी आहे.
धमकीची भाषा जी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली ती अतिशय अयोग्य आहे यावरून सभागृहांमध्ये वातावरण चांगले तापले होते.