भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये “द वॉल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडची अशी आहे नागपूरवाली लव्हस्टोरी

0

एक सो एक उत्तम भारतीय क्रिकेटपटू भारताने क्रिकेट खेळाला दिले आहेत. ज्यांची नावं मोजली तर वर्षाच्या ३६५ दिवसांपेक्षाही जास्त असतील. अशा महान क्रिकेटपटूंपैकी एक नाव आहे “द वॉल” म्हणजेच तुमचा आमचा सर्वांचा लाडका राहुल शरद द्रविड.

द्रविडने आपल्या तंत्रशुद्ध आणि बचावात्मक फलंदाजीने त्याकाळी सर्वांच्याच मनात, तसेच संघात आपलं वेगळं असं अढळ स्थान निर्माण केलं होतं. जे आजही अबाधित आहे. द्रविड आला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटत असे, कारण घाम निघून प्रतिस्पर्धी संघाची मैदानावर जवळजवळ आंघोळ होई तरीही एक द्रविड त्यांच्याकडून बाद होत नसे.

अशा या महान क्रिकेटपटची विकेट काढली एका महाराष्ट्राच्या तेही नागपूरच्या मुलीने. तिचे नाव विजेता पेंढारकर. आश्चर्य म्हणजे या दोघांची अगदी बालपणापासूनची मैत्री आहे. विजेता यांचे वडील एअरफोर्समध्ये नोकरीला होते, दरम्यान त्यांची बदली झाल्याने सगळे कुटुंब येऊन स्थायिक झाले बंगळूरू मध्ये आणि तेव्हाच पेंढारकर कुटुंबाची द्रविड फॅमिलीशी ओळख झाली.

लहानपणापासून एकत्र असल्याने अनेक मित्र मैत्रीणींमधून या दोघांची चांगली मैत्री जमली. पुढे पेंढारकरांची परत बदली झाल्यामुळे दोघांच्यात काही संवाद होऊ शकला नाही. पण दोघांच्या घरच्यांचे एकमेकांशी पत्र फोनाफोनीद्वारे संवाद सुरु होते.

मध्ये काही काळ गेला. मुले मोठी होत होती. राहुल अगदी लहानपणापासून क्रिकेट भारी खेळतो म्हणून गाजत होता. पुढे कॉलेज, विद्यापीठ गाजवत कर्नाटकच्या रणजी टीममध्ये गेला. अगदी भारताच्या इंग्लंडला गेलेल्या टीममध्येही त्याचा समावेश झाला. तिकडे विजेतालाही नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. ती डॉक्टर झाली. दोघेही कामवू लागले.

मग कधी दौऱ्याच्या निमित्ताने, रणजी मॅचच्या निमित्ताने द्रविड सारखा नागपूरला यायचा. काही ना काही कारण काढून तिकडे जायचा. मित्रमंडळी आणि घरच्यांना चाहूल येऊ लागली होती. गोष्टी एकेक स्पष्ट होऊ लागल्या. नकार दोन्ही घरांकडून असायचं काही कारणच नव्हत, मग पारंपारिक चाहपोह्यांचा कार्यक्रम पार पडला आणि दोघांचं लग्न देखील ठरलं.

अगदी मध्यमवर्गीय घराला शोभेल अश्या पद्धतीने लग्न झालं. जेवणाचा बेतसुद्धा पुरणपोळी जिलेबी गुलाबजाम असा शाकाहारी पारंपारिक मराठी मेनू होता. या लग्नासाठी फक्त खास लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर द्रविडच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले पण सुशिक्षित मध्यमवर्गीय घराप्रमाणे सगळ नीट, आखीवरेखीव आयुष्य असल्यामुळे ते दोघांनी उत्तमरीत्या निभावून नेले.

आज आता द्रविड आणि विजेता या दोघांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली. त्यांना दोन गोंडस मुलं झाली, पण हे द्रविड कुटुंब टिपिकल मराठी मध्यमवर्गीयच राहिलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.