
‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला!
देशातील राजकीय वातावरण पाहता गेल्या काही वर्षांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात इडी विरोधी पक्षांच्या चौकशा करताना दिसत आहे. विरोधकांना त्रस्त करण्यासाठी या अस्त्राचा वापर भाजप करताना दिसत आहे अशी टीका राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसून येते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने कारवाई करत अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी केली असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, ईडीच्या कारवाया फक्त भाजप विरोधी नेत्यांच्या मागे लागल्या असून भाजपचे नेते धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा सवाल जनते मधून विचारला जातो आहे.
ईडीच्या कारवाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘विरोधी पक्षांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठीच ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा करत आहे. त्यांच्या दडपशाहीला आम्ही भीत नाही. अमित शाह यांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढली आहे त्याची चौकशी ईडी का करत नाही. जो भाजपात प्रवेश करतो त्याचे सर्व पाप धुतले जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे,’ असं पटोले म्हणाले.
भाजप म्हणजे पवित्र पक्ष आहे, ज्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर देशातील कित्येक भ्रष्टाचारी नेत्यांचे पाप धुतली गेली. भाजप नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार हे सुद्धा जगजाहीर आहेत. मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी भाजप वाटेल ते करत आहे याच हेतूने ही चौकशीची ससे मारी मागे लावण्यात आली आहे हे न कळायला जनता दुधखुळी नाही.