
बारामती : पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. या ५० वर्षातले त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आणि आठवणी, अनेक जणांकडून सांगितल्या जातात. असे थोडे थोडकेच व्यक्ती असतात, ज्यांची गणना ‘न भूतो न भविष्यति’ यामध्ये होते. साहेब हे त्यापैकीच एक.
त्यांचे व्यक्तिमत्त्व तसे कुणालाही न उलगडणारे. त्यांनी फार कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वतःविषयी आणि स्वतःच्या आयुष्याविषयी सांगितले आहे. आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या बद्दल ऐकण्याचे हे भाग्य फार कमी लोकांना प्राप्त झाले आहे. बारामतीतल्या जनतेला हे भाग्य लाभलं आहे.
असाच एक किस्सा आहे, शरद पवारांच्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अशी म्हण आहे. हि म्हण शरद पवारांना तंतोतंत लागू पडते. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले भाषण चक्क दुसरीत केले आहे.
शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीलाच, इयत्ता दुसरीत असताना काटेवाडीच्या शाळेत भाषण करण्यासाठी त्यांना केवळ ६ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यांना आपले हे भाषण ६ मिनिटांमध्ये आवरायचे होते. पवारांना भाषणासाठी बोलवण्यात आले. त्यांनी आपले भाषण सुरु केले.
५ मिनिटे झाली पण शरद पवारांचे त्यावेळी घड्याळाकडे लक्ष नव्हते. ६ मिनिटे झाली. त्यावर दोन-तीन वेळा बेल वाजली. १० मिनिटं होऊन गेली. पण पवार भाषण देण्याचे काही थांबेनात. अखेर त्यांच्या गुरुजींनीच त्यांचा सदरा खेचत त्यांना थांबवलं.
त्यावेळीपासूनच त्यांना जी भाषणाची गोडी लागून राहिली ती वयाच्या ८०व्या वर्षी देखील तशीच आहे. आज त्यांच्या भाषणाला हजारो लोकांची गर्दी होते.