
एप्रिल सुरु झाला की भारतामध्ये उन्हाळा, आंबे, परीक्षा आणि सोबतच सुरु होतो लोकांना मुर्खात काढण्याचा महिना. थोडक्यात जगभरात एप्रिल महिना हा ‘एप्रिल फूल’ करण्यासाठी ओळखला जातो. कोणाचीही गंमत करणे, मस्करी करणे, मिश्किलपणे फसवणे हा आनंदाचाच एक भाग आहे.
1 एप्रिल हा दिवस याच गोष्टींसाठी बनला. या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी करतात, एकमेकांना फसवतात, थोडक्यात मुर्खात काढतात. जगभरात हा महिना एप्रिल फूल म्हणून उत्साहात साजरा केला जातो. पण नेमका हा दिवस कसा निर्माण झाला? जाणून घेऊया यामागचे कारण.
यासाठी आपल्याला जावं लागेल ते थेट १५८२ मध्ये. १५८२ मध्ये फ्रान्स ज्युलियन कॅलेंडर मधून ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये विस्थापित होत होतं. फ्रान्सला हे नवीन वर्ष वसंत विषुववृत्तात साजरं करायचं होतं आणि तो दिवस होता 1 एप्रिल. पण नागरिकांना यामागील योजना समजली नाही आणि ते 1 एप्रिललाच नवीन वर्ष समजू लागले.
तेव्हा फ्रान्सचे जवळपास सगळेच नागरिक हे ‘फूल’ म्हणजेच ‘वेडे’ ठरले होते. त्यांनी स्वतःचीच फसवणूक केली होती आणि तेव्हापासूनच एप्रिल फूल हा दिवस मूर्ख बनवण्यासाठी, गंमतीसाठी साजरा केला जातो.