गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने लागू केली नवी नियमावली

0

मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तज्ञांनी ही दुसरी लाट असून ती मागच्या वर्षीपेक्षा तीव्र असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, मागच्या वर्षीदेखील याच काळात करोनाच्या पहिल्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यामुळे सर्व सणांवर संक्रांत आली होती. या वर्षी देखील तसेच चित्र पाहायला मिळणार आहे.

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या सणाचे औचित्य साधून राज्यभरात नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे नागिरकांना करोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, यावर्षीही मराठी नववर्षोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.

या नियमावलीत सांगितल्याप्रमाणे राज्यातील नागरिकांना, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करायला परवानगी दिली गेली आहे.

तसेच राज्यात कुठेही, कोणतीही मिरवणूक किंवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारून सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

नियमावलीत सणाच्या निमित्ताने आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे, जनजागृती करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच काल झालेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात ७ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.