अंगावरून नाग गेला आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले

0

असे थोडे थोडकेच व्यक्ती असतात, ज्यांची गणना ‘न भूतो न भविष्यति’ यामध्ये होते. जसा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा गाण्यात लता मंगेशकर तसेच राजकारणात या व्यक्तीचे नाव घेतले जाते. नेतृत्व, बुद्धिमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवणारे हे नाव म्हणजे शरदचंद्र पवार.

पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. या ५० वर्षातले त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आणि आठवणी, अनेक जणांकडून सांगितल्या जातात. त्यांचा असाच एक किस्सा आहे १९७८ साली मुख्यमंत्री होण्याच्या आधीचा.

(सौजन्य : लोकसत्ता)

शरद पवार हे त्यावेळी भीमाशंकरच्या दौर्‍यावर होते. तिथले तत्कालीन स्थानिक आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे (पाटील) हे त्यांच्या सोबत होते. रात्री धुवांधार पाऊस पडल्यामुळे, त्यांनी भीमाशंकरच्या मंदिरातच मुक्काम केला. सभामंडपात शरद पवार एका बाजूला सतरंजी टाकून जामिनीवर झोपले. सगळ्यांची गाढ झोप लागली होती, मात्र वळसे (पाटील) अर्धवट जागे होते. त्याचवेळेस एक भला मोठा नाग त्यांना पवारांच्या दिशेने येत असलेला दिसला.

त्यांना काय करावे सुचेना! तो येऊन नाग पवार साहेबांच्या छातीवरून गेला. ते काही काळ श्वास रोखून थांबले. एकाएकी त्यांनी पवारांना उठवले आणि घडला प्रकार त्यांना सांगितला आणि म्हणाले, लवकरच तुमच्या बाबतीत काही तरी चांगली गोष्ट घडणार आहे.

विशेष म्हणजे, पुढच्या आठच दिवसात शरद पवार महाराष्ट्रात पुलोदचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पुलोदला आरएसएसनेही पाठिंबा दिला होता. या संधीतूनच त्यांचा जनसंपर्क वाढला. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. ते देश पातळीवरचे नेते बनले. पुढे दोन वर्षात पुलोदचे सरकार बरखास्त झाले. शरद पवार विरोधी पक्षनेते झाले. बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने पवारांची भाषणे ऐकली जात होती. यानंतर पवारांची लोकप्रियता प्रचंड वाढली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.