शरद पवार कॅन्सरशी लढू शकले त्याचे खरे कारण ‘हे’ आहे

0

असे थोडे थोडकेच व्यक्ती असतात, ज्यांची गणना ‘न भूतो न भविष्यति’ यामध्ये होते. जसा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा गाण्यात लता मंगेशकर तसेच राजकारणात या व्यक्तीचे नाव घेतले जाते. नेतृत्व, बुद्धिमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवणारे हे नाव म्हणजे शरदचंद्र पवार.

पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. अशा पवारांवर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर देशभरातून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा मिळाल्या.

काही वर्षांपूर्वी अशाच एका आजाराने शरद पवार यांना ग्रासले होते, ‘कॅन्सर’. शरद पवार यांना २००४ मध्ये जेव्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडे फक्त ६ महिने आहेत, असं सांगितलं होतं. पण या सगळ्या शक्यतांना खोटं ठरवत त्यांनी कॅन्सरवर मात केली आणि आज १६ वर्ष झाली त्या घटनेला शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत आहे.

तो २००४ चा काळ होता. लोकसभा निवडणुकांचा प्रचाराला सुरुवात झाली होती. शरद पवार महाराष्ट्रभर फिरत होते. आणि एकेदिवशी त्यांना गालाच्या आतल्या बाजूला सूज आल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने त्यांचा जिवलग मित्र डॉ. रवी बापट यांना ही गोष्ट सांगितली. पवारांच्या तपासण्या झाल्या आणि त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

पवार कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली. शरद पवार पुण्यात आले. पुढे त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. पवारांच्या चेहऱ्याचा काही भाग अक्षरशः कापण्यात आला होता आणि त्याठिकाणी मांडीच्या मांसाचा काही भाग लावण्यात आला होता.

पवारांचे काही दात काढण्यात आले होते. एकुणातच हा काळ त्यांच्यासाठी खूप मुश्कील होता. त्यांना न नीट खाता येत होते, न पाणी पिता येत होते. सगळंच कसं अवघड होऊन बसलं होतं. उंची म्हणजे साधं पाणी पिण्यासाठी देखील त्यांना भुलीचं इंजेक्शन घ्यावं लागायचं. कृषी मंत्री असताना त्यांना तब्बल ३६ वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती आणि ही उपचार पद्धती फारच त्रासदायक देखील होती.

मात्र आज हा सगळा त्रास सहन केल्याचे फळ म्हणूनच राज्यात त्यांचे सरकार आले आहे. मात्र शरद पवार यांना हा सगळा त्रास सहन करण्याची आणि कॅन्सरशी लढण्याची प्रेरणा मिळाली होती, ती एका बाईमुळे आणि ती दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द त्यांच्या आई होत्या. त्यांच्या आईवर आलेल्या एका प्रसंगातून त्यांना ही प्रेरणा मिळाली होती.

झालं असं होतं की पवार साहेब हे लहान असताना, त्यांच्या आईसोबत काटेवाडीमध्ये राहत होते. शारदाबाईंना समाज कार्याची खूप आवड होती. पण एकदा हीच सवय त्यांना महागात पडली. काटेवाडीत एक वळू सोडलेला होता. त्या वळूच्या त्रासामुळे गावातील एका व्यक्तीने त्याला पायात गोळी मारून पुरता जखमी केला होता. त्याच अवस्थेत तो वळू एका शेतात जाऊन पडला.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाबाईंना तो वळू दिसला. त्या त्याच्या जवळ गेल्या आणि अंगावर हात फिरवू लागल्या. पण क्षणात काय झाले कळाले नाही आणि त्या वळूने अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शारदाबाईंच्या पायाला मोठ्या दुखापती झाल्या. पायाच्या हाडाचा अक्षरशः भुगा झाला. मांडीच्या हाडाचा तो भाग कापण्यात आला. त्यानंतर त्यांना आयुष्यभर कुबड्यांवर राहावे लागले.

मात्र शेवटी आई ती आईच. रुग्णालयातून घरी आल्यावर त्या चांगली विश्रांती घेतील असं सर्वाना वाटलं. पण त्या मात्र पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागल्या. जनुखी त्यांच्या आयुष्यावर त्या घटनेचा काहीच प्रभाव झाला नव्हता. त्यांच्या या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा स्वभावच शरद पवार यांनी अंगीकारला. आणि कितीही मोठं संकट असलं तर त्याच्याशी पाय रोवून दोन हात करायचे हे बाळकडू त्यांनी आईकडून घेतले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.