काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात “या” मराठी महिलेचा होता हात

0

काश्मीर भारताचे “स्वित्झर्लंड”, “पृथ्वीवरचा स्वर्ग”, “भारताचे नंदनवन” अशा कितीतरी विशेषणांनी संबोधले जाते. त्याचबरोबर तिथे सतत होणाऱ्या चकमकी, त्यात दोन्ही देशाच्या जवानांचे जाणारे प्राण. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, अशी मागणी करणारे तिथले नेते. पाकव्याप्त काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेवरून दोन्ही देशांमध्ये ताणलेले संबंध आणि बरंच काही..,या सगळ्या गोष्टींचा परिणाम नक्कीच, तिथल्या आपल्या सारख्याच हाडामांसाच्या असलेल्या माणसांवर होत असेल.

भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा देशाच्या या सुंदर प्रदेशात, अत्याधुनिक अश्या सुखसोयी आणि सुविधांची वानवा होती. दळणवळणाच्या सोयी मर्यादित होत्या. सततच्या दहशतवादी कारवाया आणि सीमेवर होणाऱ्या चकमकींमुळे व्यापार, उद्योगधंद्यांची संख्या देखील फार कमी होती. उत्पन्नाचे स्त्रोत कमी कमी होते. शिक्षणाच्या सोयी अपुऱ्या होत्या. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात इथं मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. तरीही परिस्थिती फारशी बदललेली नाही.

परंतु एक बदल, मोठा बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो असं म्हणतात. देशाच्या या अतिदुर्गम आणि पहाडी भागात, म्हणाव्या तश्या सोयी सुविधा पोहचणं आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणं, देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने त्यावेळी एक अतिशय महत्वाचं काम होतं. आणि अशा परिस्थितीत त्या काळी हे काम केलं ते एका मराठी महिलेनं. शकुंतला भगत असं त्याचं नाव.

शकुंतला भगत यांना भारतातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर म्हणून देखील देशभरात ओळखलं जातं. १९५३ साली त्यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई औद्योगिक संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली. ‘सिव्हिल इंजिनिअर’ अशी अधिकृत पदवी घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला होत्या. पुढे १९६० मध्ये शकुंतला यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठामधून ‘सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी पूर्ण केली.

दरम्यान, त्यांचा विवाह मॅकेनिकल इंजिनिअर अनिरुद्ध भगत यांच्याशी झाला. या उभयंतांनी मिळून, मुंबईमध्ये ‘क्वाड्रिकॉन’ नावाची एक पूल बांधणी फर्म सुरु केली. या दोघांनी मिळून या क्षेत्रात प्रथमच ‘टोटल सिस्टीम पद्धत’ विकसित केली, आणि नुसती सुरु नाही केली तर तीचं पेटंट देखील मिळवलं. आणि त्यांच्या  पद्धतीचा उपयोग सरकारने पहाडी आणि अतिदुर्गम भागात पूल बांधणीच्या कामात केला.

या टोटल सिस्टीम पद्धतीचा वापर करत १९७२ मध्ये भगत दाम्पत्यानं हिमाचल प्रदेशच्या स्पिती भागात आपला पहिला पूल बांधून उभा केला. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यात आणि इतर पहाडी प्रदेशातल्या राज्यातही तत्कालीन सरकारच्या मदतीनं या पद्धतीने पूल उभारणीचा कार्यक्रमच हाती घेतला.

साधारण १९७८ च्या काळापर्यंत या दोघांनी मिळून काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत छोटे-मोठे असे तब्बल ६९ पूल बांधून पूर्ण केले. आणि या दुर्गम आणि दुर्लक्षित भागाला मुख्य प्रवाहाशी जोडलं. या दोघांनी मिळून संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकूण तब्बल २०० पुलांची बांधणी आणि डिझाइन केली आहे. त्यांच्या याच प्रयत्नांचं फळ म्हणून आज या पद्धतीचे स्टील पुल हे हिमालयीन आणि पहाडी क्षेत्रात जास्तीत जास्त संख्येनं दिसून येतात.

यात मुख्य वाटा होता तो शकुंतला भगत यांचा, शकुंतला यांनी अशा प्रकारचे पूल न केवळ भारतामध्ये बनवले तर त्यांनी अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, या देशांमधील प्रकल्पांवर देखील काम केलं आहे. १९९३ मध्ये शकुंतला यांना ‘वुमन ऑफ द इयर’ या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं. अशा या प्रतिभावान महिला अभियंताने २०१२ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.