
आता जो काही निर्णय घेतला जाईल, तो संपूर्ण राज्यासाठी एकच घेतला जाईल- अजित पवार
बारामती : राज्यात सध्या जाणवत असलेला करोना लसींचा तुटवडा, गेल्या २ दिवसांपासून जास्त वाढलेली करोना बाधित रुग्णांची संख्या, आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, या गोष्टींमुळे राज्यात राजकारण प्रचंड तापलेलं आहे.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर, आज अजित पवारांनी बारामतीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीबाबातही भाष्य केले.
यावेळी त्यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तसेच यावेळी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेतला जाणार नाही, तसे होणार नाही, असे स्पष्टीकरण देखील दिले.
राज्यातल्या व्यावसायिक, व्यापारी आणि दुकानदारांनी आंदोलनात केलेल्या मागण्यांविषयी आणि सोमवारपासून दुकाने उघडू द्या, या मागणी विषयी देखील, या बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सर्वपक्षीय नेत्यांचे, राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर असलेले विचार लक्षात घेऊन, त्यावर चर्चा करूनच, योग्य तो निर्णय आज रात्री किंवा उद्या जाहीर केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामती आणि पुणे जिल्ह्यातही करोनाच्या होणाऱ्या रूग्णवाढीसंदर्भात बोलताना त्यांनी, ‘करोना बाधित रुग्णांची होणारी वाढ आपल्याला रोखायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेने करावी, अशा सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल आज पुण्यात बैठक आहे, असे सांगितले.