
चार वर्षांपूर्वी आत्या म्हणून घेतलेली जबाबदारी खा.सुप्रिया सुळे आजही पार पाडत आहेत!
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या मनातील हळव्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मान त्यांच्या या पोस्ट मधून माणुसकीचे दर्शन होताना दिसत आहे. २०१९ साली आत्या म्हणून सुप्रिया सुळे यांनी जबाबदारी घेतली होती. ती जबाबदारी त्या आजही पार पाडत आहेत.
‘यशस्विनी’ हे गोड लेकरु… औरंगाबाद जिल्ह्यातील नेवपूर चिंचोली या गावची.जेव्हा तिच्या वडिलांनी स्वतःच आयुष्य संपवलं तेव्हा हे लेकरू आईच्या पोटात होते.यानंतर तिची आई मनिषा आपल्या लेकरांसह जगण्याची ‘उमेद’ घेऊन पुढे जात राहिली.
या प्रवासात आपण तिला ‘उमेद’ या उपक्रमाखाली स्वतःचा व्यवसाय उभा करण्यास व वैद्यकीय मदतीस हातभार लावला.व्यवसाय साहित्य वाटपाचा कार्यक्रम बरोबर चार वर्षांपुर्वी म्हणजे दि. २६ में २०१७ रोजी औरंगाबाद येथे सुरु होता,तेंव्हा मनिषा तिच्या या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला घेऊन आल्या. त्यावेळी मी तिला हातात घेतलं आणि तिचं नाव काय असं तिच्या आईला विचारलं. त्यावर मनिषाताई म्हणाल्या की,ताई अजून तिचं नाव ठेवलेलं नाही.उपस्थित सर्व महिला सहकारी व मनिषा मला म्हटल्या ‘ताई,तुम्हीच तिचं नाव ठेवा आणि तिच्या आत्या व्हा.’
खुप आपलेपणानं त्या माऊलीने हे नातं माझ्याशी जोडलं होतं…त्यांच्या भावनेचा मान ठेवत मी त्यावेळी तिचं नाव ठेवलं ‘यशस्विनी’…!
ती आता चार वर्षांची झालीय.तिची आई देखील आता स्वावलंबी, सन्मानाचं आयुष्य जगतेय. जगण्याची ही ‘उमेद’ आम्हा सर्वांना नात्यांच्या एका वेगळ्याच बंधनात बांधून गेलीय.यशस्विनी, तिचा भाऊ शुभम आणि आई मनिषा या तिघांनाही माझ्या खुप खुप शुभेच्छा.
अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.