“करोना काळाचे राजकारण करणाऱ्यांना, त्यांची जागा दाखवून द्या”

0

पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे.

या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे अशा दिग्ग्ज नेत्यांच्या प्रचारसभांनातर, खासदार अमोल कोल्हे यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ व्हिडीओ शेअर करत, त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

यात त्यांनी, भारत नाना येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. त्यामुळे भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन जनतेला केले आहे.

तसेच, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या काळातही जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच संधी आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षाचे नाव न घेता तोफ डागली आहे.

दरम्यान, राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.