राजकारणाचा डोस कमी करून, कोरोनावर लक्ष केंद्रित केले असते तर…

0

मुंबई : राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

तसेच राज्यात ऑक्सिजन अभावी परिस्थिती गंभीर झाली असून, काल एका दिवसात ६३ हजार ७२९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.

महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे. देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.

परिणामी शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर सामनातून आज मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने करोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती”, अशी टीका केंद्र सरकारवर केली गेली आहे.

तसेच, आज करोनाचे जे दुसरे तुफान उठले आहे, त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून करोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना, मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे,” असं म्हणत शिवसेनेने सामानातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.