अन शरद पवारांच्या एका लाखमोलाच्या सल्ल्याने वाचली, आर.आर.आबांची आमदारकी

0

पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. या ५० वर्षातले त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आणि आठवणी, अनेक जणांकडून सांगितल्या जातात. असे थोडे थोडकेच व्यक्ती असतात, ज्यांची गणना ‘न भूतो न भविष्यति’ यामध्ये होते. साहेब हे त्यापैकीच एक.

देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते अशी आज शरद पवार यांची ओळख आहे. शरद पवारांना दिल्लीला आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अनेक व्यूहरचना त्यांनी त्यांच्या, चाणाक्ष राजनीतीने सोडवल्या. अनेकांसमोर पेचप्रसंग निर्माण केले. त्यांचे अनेक किस्से समाज माध्यमांवर वाचायला मिळतात, सहकाऱ्यांकडून ऐकायला मिळतात. असाच एक प्रसंग आहे, जेव्हा आर.आर. आबांच्या मदतीला ते धावून आले होते तेव्हाचा. हा किस्सा आर.आर.पाटलांनी स्वतः भाषणात एकदा सांगितलं होता.

१९९५ साली महाराष्ट्रात युतीचं सरकार जिंकून आलं होतं. शिवसेनेचे मनोहर जोशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली. आर.आर.पाटील त्यावेळी तासगावमधून नवखे आमदार म्हणून निवडून आलेले होते. आबा राजकारणातले डावपेच शिकत होते. आणि एकेदिवशी आबांनी भर विधानसभेत, मुख्यमंत्री मनोहर जोशींना घाम फुटेल असं भाषण केलं. आणि उंची म्हणजे त्यांनी कुठलाही पुरावा नसताना या भाषणात, जोशींवर तब्बल १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा गंभीर ठपका ठेवला. सभागृहात खळबळ उडाली.

पवारसाहेब त्यावेळी हे भाषण खालच्या सभागृहातून, त्यांच्या ऑफिस मधून स्पीकरवर ऐकत होते. त्यांनी त्याचक्षणी आबांना चिट्ठी पाठवून खाली बोलावून घेतलं. आणि थेट विचारलं की, सहारा प्रकरणात तुम्ही मुख्यमंत्र्यांवर जे १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत, त्याचे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहे काय?

त्यावेळी आर आर पाटील उत्तरादाखल म्हणाले, ‘पुरावे तर काहीच नाहीत.’ पुढे आबा हे देखील म्हणाले की,  विधानसभेत बोललं तर मानहानीचा दावा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे हवेतच आरोप केले आहेत. दोन क्षण शांततेचे गेले आणि पवारसाहेब म्हणाले मानहानीचा दावा नाही; पण विशेषाधिकार वापरून तुमची आमदारकी जाऊ शकते.

आबांना आमदारकी साठीचे केलेले सगळे प्रयत्न, घेतलेले सगळे कष्ट आठवले. आबा झालेली चूक मान्य करून म्हणाले, साहेब चुकलं माझं. त्यावेळी चाणाक्ष शरद पवारांनी आबांना सांगितलं की, जेव्हा तुमच्या सभागृहातल्या भाषणाची प्रत तुमच्याकडे संमतीसाठी येईल, तेव्हा त्यात, “अशा बाहेर चर्चा आहेत” या ओळी टाका.

नंतर जेव्हा आर.आर.पाटलांकडे भाषणाची प्रत संमतीसाठी पाठवण्यात आली. तेव्हा त्यांनी शेवटी, “बाहेर अशा चर्चा आहेत” ही  वाक्य लिहिली. आणि अशाप्रकारे शरद पवार यांच्या एका लाखमोलाच्या सल्ल्याने आबांची आमदारकी वाचली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.