रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोची कंपनीची मोठी मदत…वाचा नक्कीच अभिमान वाटेल

0

महाराष्ट्रामध्ये ज्या च्या वेळी अडचणीची परिस्थिती उद्भवली त्या त्या वेळी सहकार्याच्या भावनेने आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो ने मोठी मदत केली. त्यांच्या या कार्याबद्दल वेळोवेळी लोकांमधून कौतुक झालं. आज आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून बारामती ॲग्रो च्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या संदर्भात लेखाजोखा मांडला.

“राज्यात कोरोनाने प्रवेश केल्यापासून सरकारने त्याला रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. पहिल्या लाटेत एकंदर जगामध्येच गोंधळाची परिस्थिती होती, आपणही चाचपडत होतो आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचं पालन करत होतो. मीही माझ्या परीने शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरची मागणी एकदम वाढली आणि त्याच्या किंमतीही भडकल्या. अगदी ५०० ₹ पासून १ हजार ₹ लिटर पर्यंत सॅनिटायझरच्या किंमती वाढल्या. अशा वेळी ‘बारामती ऍग्रो’च्या माध्यमातून राज्यभरातील कोविड योध्यांसाठी शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, पोलिस आयुक्तालये आणि धार्मिक स्थळं यांना सुमारे एक लाख लिटर सॅनिटायझर मोफत पाठवलं. त्यामुळं कोविड योध्यांना त्याची मदत झालीच, शिवाय आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केल्याने लिटरसाठी ५०० ₹, १००० ₹ असे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले.

आजही ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. त्यामुळं ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून ‘बारामती ऍग्रो’च्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील शासकीय हॉस्पिटलला देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्याकडं ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सुपूर्द केले. लवकरच त्यांचं विभागवार रुग्णालयांना वाटप केलं जाईल.

दोन वर्षांपूर्वी राज्य दुष्काळाच्या झळा सोसत असताना अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई होती. अशा प्रसंगी बीड, सातारा, नगर या शेजारच्या जिल्ह्यांना सुमारे सहा महिन्यातून अधिक काळ टँकरने पाणीपुरवठा करून त्या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचं कामही ‘बारामती ऍग्रो’ने केलं. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेला प्रलयातही मदतीचा हात दिला.

कोल्हापूर-सांगली, पंढरपूर इथं आलेल्या पुरात तिथल्या अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः वाहून गेला होता, त्यावेळीही नागरिकांना जीवनावश्यक साहित्य, खाद्यपदार्थ, औषधं याचं ‘बारामती ऍग्रो’च्या माध्यमातून वाटप केलं. राज्यात जिथं कुठं नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्या प्रत्येक क्षणी ‘बारामती ऍग्रो’ने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मदतीचा हात दिला. आजही कोविड रुग्णांसाठी राज्याची गरज ओळखून ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर’ पुरवण्यासाठी ‘बारामती ऍग्रो’ कंपनी पुढं आलीय.

या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आणि अधिकाऱ्याने केलेल्या प्रामाणिक कष्टामुळं हे शक्य झालं आणि अत्यंत समर्पित भावनेने काम करत असलेल्या या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावरच यापुढंही सामाजिक भान ठेवून असंच काम केलं जाईल, असा मला विश्वास आहे”!

अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहित रोहित पवारांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.