
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर यशस्वीरीत्या एन्डोस्कोपी करण्यात आली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील एक शरद पवारांचा एक फेसबुक फोटो पोस्ट करत, आपल्या वडिलांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, पुढील आठ-दहा दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया करून त्यांचे गॉलब्लॅडर (पित्ताशय) काढण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. हे काढल्यामुळे शरद पवार यांच्या दैनंदिन व्यवहारांवर कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील टोपे म्हणाले.
सध्यातरी पवारांना विश्रांतीसाठी हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आल्यानंतरही त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. परंतु, टोपे यांनी राज्यातील नागरिकांना चिंता करण्याचं कारण नाही असं सांगितला आहे.
काल संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.