
जगात लोकसंख्या हा कळीचा मुद्दा होत चाललेला आहे. भारतासारख्या देशात तर सगळ्याच गोष्टी या मुद्द्याभोवती फिरतात. येत्या काही वर्षात भारताची लोकसंख्या हि चीनला ओलांडून जाईल, असे तज्ञांचे मत आहे. परंतु जगात असाही एक भाग आहे, जिथे केवळ १०० लोकच उरले आहेत आणि त्यामध्ये केवळ तीन लहान मुलांचा समावेश आहे. हा प्रदेश आहे दक्षिण कोरिया मधला.
दक्षिण कोरियातील वृद्ध होत असलेली लोकसंख्या आणि वेगाने घटत असलेला जन्मदर यामुळे या बेटावर अशी परिस्थिती ओढवली आहे. या तीन मुलांमध्ये ल्यू चान ही आणि त्याच्या दोन बहिणींचा समावेश आहे. ल्यु चानला खेळण्यासाठी दुसरा मित्र नाही. त्यामुळे त्याला रोज चक्क ६६ वर्षांच्या किम सी यंग यांच्यासोबत खेळावे लागते.
‘नोकोडो’ असे या बेटाचे नाव आहे. या बेटावर असलेली शाळा पंधरा वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. गेल्या काही दशकांपासून दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण या गोष्टीला कारणीभूत आहे असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे.
‘नोकोडो’ हे बेट एकेकाळी मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध होते. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सियोलसारखे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही. मात्र एकटेपणामुळे येथील अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दक्षिण कोरिया जगातील सर्वात वेगाने वृद्ध होत असलेल्या देशांपैकी एक देश आहे. याशिवाय या देशामध्ये जन्मदरसुद्धा खूप कमी आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या अशाच प्रकारे कमी होत गेली तर नोकोडो बेट पूर्णपणे नष्ट होईल आणि येथे राहणारा कुणीच नसेल.