
राजकारण, प्रचारसभा, निवडणुका म्हटलं की पैसा आलाच. सध्या पैश्याशिवाय राजकारणात एकही गोष्ट शक्य नाही. राजकारणात “पैसा बोलता है” पण या देशात अशा नेत्यांचीही कमी नाही, ज्यांनी पैश्याला राजकारणात दुय्यम स्थान देऊन केवळ जनआधारावर राजकारणात यश मिळवून दाखवलं.
अशाच एका नेत्याचं नाव आहे आलमबदी आझमी. उत्तर प्रदेशातल्या आझमगढच्या निजामाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीतत्व करणाऱ्या आलमबदी आझमी यांनी चक्क कोणताही प्रचार न करता आणि एकही पैसा खरच न करता चार वेळा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. कदाचित यावर विश्वास ठेवणं तुम्हाला जड जाईल.
पण ही गोष्ट अगदी खरी आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात अतिशय साधे आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार वेळा आमदार होऊन देखील आझमी एका छोट्याश्या घरात राहतात आणि आपल्या दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करतात. एवढेच नाही तर विधानसभेत जाण्यासाठी देखील ते राज्य परिवहन सेवेच्या बसचा वापर करतात.
देशात २०१४ सालापासून आलेल्या मोदी लाटेतही त्यांनी आपली ही जादू कायम ठेवत ठेवली. आझमगढच्या निजामाबाद विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधी असणाऱ्या आलमबदी यांनी २०१७ च्या मोदी-योगी लाटेत सुद्धा बहुजन समाजवादी पार्टीच्या माजी मंत्री राहिलेल्या चंद्रदेव राम यादव यांचा १८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आणि ते चौथ्यांदा आमदार झाले.

२००३ साली उत्तर प्रदेशच्या सत्तेत असलेल्या मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री असताना, आलम बदी यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ठ होण्याविषयी सुचवलं होतं. पण आलम बदी यांनी या संधीला नम्रपणे नकार दिला.
यामागेही त्याचं स्वतःच एक तत्वज्ञान आहे, ते म्हणतात की “मतदारसंघातील लोकांनी त्यांची सेवा करण्यासाठी मला निवडून दिलेलं आहे, मग मी एखाद्या मंत्रिमंडळातला मंत्री होऊन काय करू?” असा हा जगावेगळा नेता भारतात सध्याच्या काळात सापडणं फारच दुर्मिळ म्हणावं लागेल. अशा या भारतमातेचे सुपुत्र असलेल्या आलमबदी आझमी यांच्याकडून प्रेरणा काही थोडे जरी या राजकारणात सक्रीय झाले तरी भारतीय राजकारणाचे स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही.