
शरद पवारांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दाखल केली तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयक अपमानास्पद टिपण्णी केली होती. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट देखील केल्या होत्या. यात देवेंद्र फडणवीसांच्या माजी प्रसिद्धीप्रमुखाचा देखील समावेश होता. जितेंद्र आव्हाड यांनी आशा विकृतांचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर पवार साहेबांवर करण्यात आलेल्या विकृत टीका टिपण्णीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशा लोकांची यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब सध्या आजारी आहेत.त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.आदरणीय साहेब तिथे उपचार घेत असून,सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत.जी आमच्यासाठी तसेच आदरणीय साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
आदरणीय साहेबांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सुर बाहेर पडले.समाजातील असा कोणताही घटक नसेल,ज्यातून साहेबांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत.मला जसा अनुभव आला तसाच अनुभव आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांना देखील आला.
परंतु हे काळजीचे जसे फोन येत होते,मेसेजेस येत होते,त्याच्या विरोधात अनेक विकृत मंडळी आदरणीय साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हिन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत होती.काहींनी तर साहेबांच्या मरणाच्या आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.
या पोस्ट्स पाहून आदरणीय साहेबांना मानणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला.भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार करत,गेली 50 वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान,स्वाभिमान असणाऱ्या साहेबांच्यावर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती.
परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडविण्याचे ठरवले आहे.आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही मुंबई येथे आदरणीय साहेबांच्या विरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात सायबर क्राईम चे एस.पी.श्री. शिंत्रे साहेब यांची भेट घेऊन,कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४,४६९,४९९,५०७,३५, IT act 66(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.” अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नोंदवली आहे.
‘आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो,आहोत.पण यापुढे मात्र आदरणीय साहेबांच्या वर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,हे निक्षून सांगतो आहोत.’ असे देखील शेख यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर भविष्यात देखील कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे यापुढे शरद पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना शब्दांचा जपून वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. यावेळी मेहबूब शेख यांच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे व सुरज चव्हाण देखील उपस्थित होते.