
मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रासह भारतातील शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे राज्यातील शेतकरी तर हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत भारतीय कृषी क्षेत्राचही मोठं नुकसान होतं आहे. अशा परिसस्थितीत शेतकऱ्यांना जर हवामानात होणाऱ्या बदलांचे संकेत अगोदरचं मिळाले तर, नुकसान बऱ्यापैकी कमी केलं जाऊ शकते. हाच विचार करून अमेरिकेच्या नासा (NASA) संस्थेत काम करणाऱ्या डॉ. पराग नार्वेकर यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून घरवापसी केली आहे.तब्बल १२ वर्षे अमेरिकेच्या नासा संस्थेत नोकरी केल्यानंतर, डॉ. पराग नार्वेकर यांनी आपलं घर गाठत शेतकऱ्यांना उपयोगात येईल असं अत्याधुनिक हवामान केंद्र विकसित केलं आहे. विशेष म्हणजे संबंधित हवामान केंद्रासाठी वापरण्यात येणारे सेन्सर यापूर्वी जवळपास दीड लाख रुपयांना मिळायचे. पण पराग नार्वेकर यांनी हेच सेन्सर अवघ्या दहा हजार रुपयांत उपलब्ध करून दिलं आहे. मागील तीन वर्ष संशोधन केल्यानंतर त्यांनी हे सेन्सर विकसित केले आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना अनेक बाजूंनी फायदेशीर ठरणार आहे.
खरंतर, पराग नार्वेकर यांनी आयआयटी मुंबई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्यांनी थेट अमेरिकेच्या नासा संस्थेत मजल मारली. याठिकाणी त्यांनी १२ वर्षे काम केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञानावर संशोधन केलं आहे. पण अमेरिका आणि युरोपमध्ये वापरण्यात येणार प्रगत कृषी तंत्रज्ञान भारतातही उपलब्ध करावं, हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नासातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आहे.
नार्वेकर यांनी नाशिकमधील सह्याद्री फार्मच्या सहकार्यानं विकसित केलेल्या अत्याधुनिक हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बसून वाऱ्याचा वेग, दिशा, सौरकिरणं, बाष्पीभवन, पाऊस, ओलावा, तापमान आदींची माहिती मिळणार आहे. शिवाय पिकांच्या मुळांना पाण्याची गरज भासली किंवा पिकांवर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर याची पूर्वसूचना देखील मिळते. याचा शेतकऱ्यांना कैकपटीनं फायदा होणार आहे. हवामानातील लहरीपणाच्या पूर्व सूचना मिळाल्यानं शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळता येणार आहे.