
मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा मुंबईकरांना इशारा, नियम पाळा नाहीतर…
मुंबई : शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे.
मुंबईत देखील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये अशीच परिस्थिती असून, ती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश देखील त्यांनी बुधवारी दिले आहेत.
मात्र, तरीही मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून, नागरिक किराणा माल, भाजीपाला मार्केट, सार्वजनिक ठिकाणी जमावात वावरताना दिसत आहेत.
त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी, पोलिसांना संयमाने कारवाई करण्याच्या सूचना आहेत; पण त्यांना कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा मुंबईकरांना दिला आहे. तसेच नियमांचे पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आज झूम मीटिंगद्वारे घेतलेल्या पोलिसांसोबतच्या बैठकीत त्यांनी कारवाईबाबत मार्गदर्शन केले आहे.
यावेळी त्यांनी, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस फाैजफाटा तैनात करण्यात येणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ५५ वर्षांवरील कर्मचारी, अधिकारी यांना सध्याच्या परिस्थितीत पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच फील्ड वर्कसाठी जास्तीत जास्त तरुण पोलिसांवर जबाबदारी देण्यात येत आहे. यावेळी त्यांनी कडक निर्बंधांच्या काळात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही मुंबईकरांना केले आहे.