
‘मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराला व्यस्त आहेत’, पीएमओ कडून मुख्यमंत्र्यांना मिळाले उत्तर
मुंबई : राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील करोना बाधितांची संख्या ६० हजारांवर गेली असून, करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या कमी पडत असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला गेल्या २४ तासांत तीन वेळा फोन केला असता, पंतप्रधान कार्यालयकडून मुख्यमंत्र्यांना, मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे उत्तर देण्यात आले आहे.
आज दिवसभर याचीच चर्चा देशात आणि राज्यात सुरु होती. दरम्यान, यावरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला असून, त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे.
मात्र नंतर मुख्यमंत्र्यानी, मोदींसोबत चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, त्यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन अभावी परिस्थिती गंभीर झाली असून, काल एका दिवसात ६३ हजार ७२९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.