
मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा – नाना पटोले
सध्या कोरोनाच्या परिस्थितीवरून जगभराती नामवंत वृत्तपत्रांमधून भारतातील परिस्थितीवरून अक्षरशः इज्जतीचे धिंडवडे काढण्यात आले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान या परिस्थितीला गांभीर्याने घेताना अजूनही दिसत नाहीत याच गोष्टीवरून आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर टीका केली.
“भाजपचे लोक गांधी परिवारावर टीका करून अजून किती दिवस राज्य करणार? एम्स असो रुग्णालये असो तसेच सगळ्या व्यवस्था असो, देशाला उभं करण्याचं काम काँग्रेसने केलं. भाजपप्रमाणे लसीकरण बाजूला सारून सेंट्रल विस्टावर २० हजार कोटी खर्च करण्याचं पाप आम्ही नाही केलं” असे प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले म्हणाले.
“केंद्र सरकारने १७% लोकांचं लसीकरण केल्याचं जाहीर केलं. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोवॅक्सिन आणि सिरमने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा”. असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे नाना पटोले यांनी मागणी केली की “सुरवातीला केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही मोफत लस देतो आहे. नंतर मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकल्याने ती जबाबदारी राज्यांना उचलावी लागली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करावं आणि त्याबद्दलची स्पष्टता लोकांसमोर आणावी”.
देशातील परिस्थिती वरून आक्रमक होत नाना पटोले यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्र सरकारच्या दुपट्टी भूमिकेवर ठोस पणे त्यांनी भूमिका उपस्थित केली आहे.