
“मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल; काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने”
देशातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. नोटबंदी ने लहान-मोठे उद्योग बंद पडले आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली तसेच देशभरातील सरकारी कंपन्या विकण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. काळे कायदे आणून शेतकरी आणि कामगाराला देशोधडीला लावले. या सर्व गोष्टींच्या विरोधात मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्त काँग्रेस हटके आंदोलन करणार आहे.
मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही, मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने देश 25 वर्षे अधोगतीकडे गेला असून, त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करून टाकला, असंही नाना पटोले म्हणालेत.
देशभरातील कारभाराचा सावळागोंधळ हा मोदी सरकार आल्यापासून सुरू आहे. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे; पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य माणसाचे जीवन उध्वस्त झाले आहे. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस उद्या राज्यभर निदर्शने करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलीय.