मनोहर जोशींची राजकीय खेळी अन निवडणुकीला भुजबळ उभे राहिले पवारांच्या विरुद्ध

0

महाराष्ट्रातल्या राजकारणात इतर राज्यांच्या मानाने सातत्याने उलथापालथ होत राहिली आहे. असाच एक काळ आहे, ऐंशीच्या दशकातला. याकाळात महाराष्ट्रातील राजकारण अधिक अस्थिर होते. देशात अनेक घटना घडत होत्या. आंदोलने होत होती. अनेक नवीन, तरुण, तडफदार नेते या आंदोलनांतून समोर येत होते. असाच एक शिवसेनेचा नेता महाराष्ट्रात त्या काळी आपली छाप उमटवत होता, छगन भुजबळ.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसारखेच, त्यांचेही जीवन संघर्षमय होते. अगदी साध्या कुटुंबातून येऊन त्यांचा प्रवास महापौराच्या पदापर्यंत झाला होता. त्याकाळात भाजप-शिवसेना आपली ताकद महाराष्ट्रात वाढवण्याचे प्रयत्न करत होते. पक्ष मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्षातले नेते, महाराष्ट्र पिंजून काढत होते.

तेव्हा शिवसेना महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ देखील कायम वावरत असायचे. बेळगाव-कारवारच्या आंदोलनात भुजबळांनी केलेल्या कारनाम्यांमुळे, त्यांना जवळपास दीड महिने कर्नाटकाच्या जेलची हवा खावी लागली होती. परंतु, भुजबळ तिथून बाहेर आले आणि एकाएकी त्यांना महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली. आणि त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा शिवसेनेला झाला.

अचानक एकेदिवशी बाहेरगावी असताना भुजबळांना मनोहर जोशींचा फोन आला. आणि त्यांनी सांगितलं की, गरवारे क्लबची निवडणूक आहे, विरुद्ध बाजूला शरद पवार आहेत आणि त्यांच्यासमोर निवडणुकीत तुम्हाला उभं राहायचं आहे. भुजबळ तेव्हा क्लबचे सक्रीय सदस्य होते, पण त्यांना मुंबई क्रिकेट क्लबमधल्या राजकारणाची एकंदरीतच कल्पना नव्हती.

निवडणूक अगदीच तीन-चार दिवसांनीच होती. मनोहर जोशींनी आणि त्यांच्या मुलाने फॉर्म भरला होता. भुजबळ बाहेरगावहून तातडीने मुंबईला येऊन थडकले. आणि मुंबईला येऊन पोहोचताच त्यांनी मनोहर जोशींना फोन केला. तसे त्यांना कळाले की जोशी बाहेरगावी गेलेत. छगन भुजबळ यांना आश्चर्य वाटलं.

भुजबळ ताबडतोब बाळासाहेबांकडे गेले. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. आणि गरवारे क्लबच्या निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी बाळासाहेब स्वतः सरसावले. त्यांनी त्यांच्याकडून भुजबळांच्या विजयासाठी फिल्डिंग लावली. निवडणुकीचा दिवस उजाडला. छगन भुजबळ सोबत काही शिवसैनिकांना घेऊन मतदानाच्या ठिकाणी जाऊन पोहचले.

आणि समोर पाहतात तर काय! समोर शरद पवारसाहेब आणि त्यांच्या पॅनलच्या लोकांसोबत, मनोहर जोशींचे भाचे, सुधीर जोशी आणि त्यांचा ग्रुप पवारांचा प्रचार करण्यासाठी उभा होता. खरं तर या निवडणुकांमध्ये पक्षाचा संबंध नसतो. पण मनोहर जोशींच्या राजकीय खेळीमुळे, आपोआपच या निवडणुकीला पक्षीय राजकारणाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. निवडणूक पार पडली..

शेवटी निकाल जो काही लागायचा तो लागला. भुजबळ प्रचंड मतांनी पराभूत झाले होते. तडक ते तसेच त्यादिवशी संध्याकाळी मुंबईच्या महापौर बंगल्यावर गेले. आणि घडलेला प्रकार बाळासाहेबांच्या कानावर घातला. हा आता बाळासाहेबांनाही तसा निकालाचा अंदाज होताच. पण भुजबळांनी जे काही सांगितलं, ते ऐकू त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

भुजबळांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी बाळासाहेबांपुढे कुणाचे काय चालणार. परंतु, त्यादिवशी भुजबळांचा उर अभिमानाने भरून आला होता. बाळासाहेबांनी स्वतःहून या सगळ्या घटना प्रसंगामध्ये लक्ष घालून, आपला विचार केला, याचे त्यांना समाधन वाटत होतं. आपण पडल्याचं त्यांना दुःख झालंय, याचं त्यांना अप्रूप वाटत होतं. म्हणूनच ते म्हणतात की मी भलेही पक्ष सोडला होता; पण बाळासाहेबांबद्दलचं माझं प्रेम तसूभरही कधी कमी झालं नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.