“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसुन जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही”

0

मुंबई : राज्यात दोन महिन्यांपासून करोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, गेल्या आठवड्याभरात या संख्येचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी करोना प्रतिबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली.

पुण्यात देखील इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांच्या जाणवत असलेल्या कमतरतेमुळे, आरोग्य प्रशासनाचा गोंधळ उडाला असून, पुण्यातील करोना स्थिती आणि संबंधित उपाययोजनांचा आढाव घेण्यासाठी काल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर अधिकाऱ्यांच्यात बैठक पार पडली.

या बैठकीत जावडेकरांनी राज्य सरकारवर शेलक्या टीका करत, केंद्र राज्याला सर्वतोपरी मदत करत असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, चालू वेळेपर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत, त्यापैकी ९५ लाखांचा वापर झाला असून, उर्वरित व्हॅक्सिन्स शिल्लक आहेत, असे सांगितले.

यावेळी त्यांनी परत राज्य सरकारवर टीका करत, या उर्वरित लसींचे योग्य आणि नियोजनबद्ध वाटप, राज्य सरकारकडून झाले पाहिजे असे सांगत, ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची करत बसण्याची नाहीये, असे सांगितले. तसेच, राज्यात करोना परिस्थितीवरून सुरु असलेल्या राजकारणाचे, आम्ही जरुर वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ, असे मत व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर, सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना, “प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे,” असं म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यामुळे एकीकडे एकत्र येण्याच्या वल्गना करताना, दुसरीकडे मात्र एकमेकांवर टीका करत राहण्याचा हेका राज्य आणि केंद्रातल्या मंत्र्यांनी सुरूच ठेवल्याचे चित्र यामुळे पाहायला मिळत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.