‘महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे’, यशोमती ठाकूर यांचे पांडुरंगाला साकडे !

0

महाराष्ट्र राज्यातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाने निमित्त भाविक येत असतात. आषाढी वारी निमित्त यावर्षी मानाच्या दहा पालख्या जाणार आहेत त्यामध्ये अमरावती मधील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणी मातेच्या पालखीचा समावेश आहे. महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी या पालखीचे दर्शन घेतले.

महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत या पालखी विषयी माहिती दिली आहे. “ही पालखी श्रीसंत सद्‍गुरू सदाराम महाराज यांनी इ. स. १५९४ साली सुरू केलेली व ४२७ वर्षांची परंपरा लाभलेली विदर्भ राजकन्या जगतजननी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी आहे. आज ही पालखी एसटी बसने निघते आहे , २० जुलैला एकादशीला श्रीक्षेत्र कौंडण्यपूर देवस्थानच्या वतीने पांडुरंगाला अहेर करून २१ जुलैला परतीचा प्रवास करणार आहे. रुक्मिणी मातेच्या पालखीने यावर्षी ४२७ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. आज रुख्मीणी मातेच्या पादुकांचा अभिषेक व प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहुन पालखीला पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ केले”. अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.

तसेच त्यांनी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.