
तापसी व अनुरागवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई!
बुधवारी मुंबई आणि पुण्यातील बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मन्तेना यांचा समावेश आहे. दोन्ही शहरांमध्ये 30 ठिकाणी आयटी विभागाचा शोध सुरू आहे. हे छापे फॅन्टम फिल्म्सशी संबंधित आहेत. हा एक योगायोग आहे की ज्यांच्या स्थानांवर छापे टाकण्यात आले त्यातील चार प्रसिद्ध व्यक्तींपैकी, तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप वेगवेगळ्या विषयांवर मोदी सरकारला विरोध करत आहेत.
फँटम फिल्म्स कंपनीच्या कामकाजात व व्यवहारातील गैरप्रकारांवर आयकर विभागाचा संशय आहे. छाप्यात सापडलेली कागदपत्रे आणि पुरावे यांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढू शकते. त्यात आणखी बरीच मोठी नावे येऊ शकतात. इन्कम टॅक्सचे अधिकारी हे मधु मन्तेनाच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी च्या कार्यालयातही पोहोचले आहेत. असे म्हटले जात आहे की ही कंपनी फॅंटम फिल्म्सशी संबंधित होती.
अनुराग आणि तापसी हे देशातील काही विषयांवर चुकीच्या मतप्रदर्शना साठी ओळखले जातात. तापसी ने शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. जेव्हा पॉप स्टार रिहाना यांनी या चळवळीवर सोशल मीडियावर भाष्य केले तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सरकारच्या बाजूने ट्विट केले होते. या सेलिब्रिटींविरोधात तापसीने आपले मत व्यक्त केले होते. त्याचवेळी अनुराग कश्यप यांनी सीएएसारख्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेराव घातला होता.
फॅंटम फिल्म्स कंपनी २०१० मध्ये अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मन्तेना आणि विकास बहल यांनी सुरू केली होती. विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर २०१८ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती. यानंतर हे चार भागीदार वेगळे झाले. या चार जणांवर असा आरोप आहे की फॅंटम फिल्मसचे उत्पन्न प्राप्तिकर विभागाला योग्यरित्या जाहीर केले गेले नाही आणि ते कमी असल्याचे दर्शविले गेले.
फॅंटम फिल्म्स कंपनीचा पहिला चित्रपट २०१३ मध्ये ‘लुटेरा’ म्हणून आला होता. त्यानंतर या बॅनरखाली हंसी तो फसी, क्वीन, अग्ली, एनएच १०, हंटर, मुंबई वेलवेट, मसान, शानदार, उडता पंजाब, रमण राघव -२, रॉन्ग साइड राजू, मुक्काबाज, सुपर ३० आणि धूमकेतू असे चित्रपट बनवले गेले. धूमकेतू २०२० मध्ये प्रदर्शित झाला.
महाराष्ट्रातील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणल्या, देशात लोकशाही शिल्लक नाही, लोकांना त्रास देण्यासाठी केंद्र आपल्या संस्था वापरत आहे. केंद्राच्या विरोधात बोलल्यामुळे या कलाकारांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र सरकारचे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, “हे छापे काही नवीन नाही. आजकाल हा रोजचा विषय बनला आहे. जो केंद्र सरकारविरूद्ध बोलतो, सरकार दबाव आणण्यासाठी ही पद्धत अवलंबवते. अशा माध्यमातून लोकांचा आवाज थांबविण्याचे सरकार काम करत आहे. ‘ प्राप्तिकर विभाग या प्रकरणाचा तपास करीत आहे.