
पाचगणीत नगराध्यक्ष गटातील नगरसेवकांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
महाबळेश्वर येथील पाचगणी नगरपालिकेतील सत्ता समीकरण बदलली असून नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर गटातील नगरसेवक दलावर बागवान यांनी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.परिणामी मकरंद पाटील गट मजबूत झाला असून सद्यस्थितीत त्यांच्याकडे 10 नगरसेवक झाले आहेत.
पाचगणी नगरपालिकेत कर्हाडकर गटाचा दबदबा असून त्यांनी कायद्याचा वापर करत तसेच कास्टींगचा मतांचा वापर करत उपनगराध्यक्ष निवडीत विरोधकांना जेरीस आणले होते, परंतु नगराध्यक्ष गटाचे दलावर बागवान यांनी आमदार पाटील गटाला ताकद देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने वेगळी राजकीय समीकरणे दिसून येत आहेत.
उपनगराध्यक्ष निवडीत पिछेहाट झालेल्या मकरंद पाटील गटाने मुसंडी मारत पुन्हा एकदा संख्याबळ गाठण्याची तयारी सुरू केली होती.त्यातच नगराध्यक्ष गटातील विश्वासू नगरसेवक दलावर बागवान यांनी काही दिवसांपूर्वी महत्वाच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थिती दाखवल्यामुळे चर्चेला ऊत आला होता. अखेर नगरसेवक दिलावर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.