बीडमध्ये भाजपच उसन आवसान, नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणायचे कुठून

0

बीडमध्ये नगर पालिकेच्या निवडणुका लागताच महाविकास आघाडी सरकारच्या निषेधात भाजपच आंदोलन झाले. पण, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत २३ भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता. बीड नगर पालिकेच्या एकूण ५० जागा आहेत. विशेष म्हणजे आंदोलनातील सहभागाचे हे चित्र आजचे नाही तर मागच्या अनेक दिवसांपासूनचे आहे. किमान बीड शहरातील आंदोलनात तरी भाजपने तिनांकी संख्या गाठली तर लढण्यासाठी तरी हा दोनांकी आकडा गाठता येईल आणि जिंकण्याचे काहीही झाले तरी किमान सर्व जागा लढता तरी येतील अशी परिस्थिती आहे.

बीडची नगर पालिका जिल्ह्यात सर्वात मोठी आणि ५० नगरसेवकांची आहे. बीड पालिकेवर क्षीरसागर आणि मुंडे मैत्रीमुळे भाजप वाढीस कायम मर्यादाच आल्या. त्यामुळे नगर पालिका जिंकायची हे गणित काही वेळ बाजूला ठेवून केवळ लढण्यासाठी भाजप ५० उमेदवार कसे उभे करणार, हाच यक्षप्रश्न आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतर तरी बीडकरांना पाणी, रस्ता, वीज अशा काही समस्या आहेत किंवा नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात हाती घेतलेल्या योजनेत काही अनियमितता झाल्यात, सत्ताधारी एखाद्या गोष्टीसाठी कमी पडताहेत असे बीड भाजपला वाटलेले नाही हेही नमूद करण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपने एखादे पालिकेविरोधात वा सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलेले नाही. आता पालिकेचा कारभारच उत्तम आहे म्हणून आंदोलन नाही का? आंदोलन करायचे तर आंदोलक कुठून आणायचे असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे हे त्यांनाच ठाऊक. पण, जिंकण्याचे काहीही झाले तरी लढण्यासाठी ५० तगडे लोक लागणार आहेत. एखाद्या आंदोलनाला जरी येवढी संख्या जमली तरी भाजपचा विजयच म्हणावा लागेल.

वर्षभरापूर्वी नवी जिल्हा कार्यकारिणी झाली आणि अलीकडे नवे शहराध्यक्षही निवडले आहेत. आता त्यांना नगर पालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. शहरात भाजपला मानणारा मोठा वर्गही आहे. पण, या घटकाला सोबत घेण्यात आणि विश्वासार्हता निर्माण करण्यात अद्याप भाजपला यश आलेले नाही. वर्षभराच्या या काळात अनेक आंदोलने झाली ती फक्त राज्य पातळीवरील नियोजनाचीच. मात्र, एकही आंदोलनाला सहभागींची संख्या तिनांकी झाली नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.